संजय राऊत यांच्या सभेप्रकरणी आयोजकांना एक हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:23 AM2021-04-19T04:23:09+5:302021-04-19T04:23:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रचारसभा घेतल्याप्रकरणी बेळगाव प्रशासनाने आयोजकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रचारसभा घेतल्याप्रकरणी बेळगाव प्रशासनाने आयोजकांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोरोना नियमांचे कारण पुढे करीत या सभेवर दंडात्मक कारवाईचे आदेश प्रशासनाने बजावले आहेत.
सीमा भागातील मराठी माणसाला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कायदेशीर कारवाईत अडकवू पाहणाऱ्या ‘कर नाटकी’ प्रशासनाला संजय राऊत यांची ही सभा खटकली आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत हे बेळगावमध्ये आले होते. यावेळी इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने हेही उपस्थित होते. यावेळी १४ एप्रिल रोजी संयुक्त महाराष्ट्र चौकात त्यांची भव्य सभाही झाली. सभेच्या सुरुवातीपासूनच पोलिसांनी अनेक कारणे सांगून सभेला आडकाठी करण्यात आली; परंतु सभेसाठी रीतसर परवानगीची कागदपत्रे दाखविल्यानंतर पोलिसांची कुरघोडी सुरूच होती. आता या सभेत आता कोविड नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे कारण पुढे करीत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या सभेत नियम पाळण्यात न आल्याने त्यांनी १००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.