सेहगल यांना रोखणाऱ्या साहित्य संमेलन आयोजकांचा कोल्हापुरात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:05 AM2019-01-08T11:05:03+5:302019-01-08T11:07:12+5:30
यवतमाळ येथे ११ जानेवारीपासून होणारे ९२ वे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात अडकले आहे. साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, महामंडळाने स्वत:च संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सेहगल यांना संमेलनाला येऊ नका, असा संदेश पाठविल्याच्या घटनेचा साहित्य वर्तुळात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण असलेल्या कोल्हापूर आणि सातारा येथील साहित्यिकांनी तर या संमेलनातील सहभागच नाकारला आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : यवतमाळ येथे ११ जानेवारीपासून होणारे ९२ वे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात अडकले आहे. साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, महामंडळाने स्वत:च संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सेहगल यांना संमेलनाला येऊ नका, असा संदेश पाठविल्याच्या घटनेचा साहित्य वर्तुळात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण असलेल्या कोल्हापूर आणि सातारा येथील साहित्यिकांनी तर या संमेलनातील सहभागच नाकारला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी येथील साहित्यिकांनी केली आहे. नयनतारा सेहगल यांना रोखून महामंडळाने गुन्हा केला आहे, यामुळे महाराष्ट्राचाच अपमान झाल्याची तीव्र प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहेत.
साहित्य संमेलनाचे विद्ममान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, त्यांनी या संमेलनात जाऊन मावळता अध्यक्ष म्हणून मी या सर्व प्रकाराबद्दल माझे परखड भाष्य करणारे समारोपाचे भाषण करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
सातारा येथील साहित्यिक डॉ. महेश गायकवाड यांनाही साहित्य संमेलनात होणाऱ्या परिसंवादासाठी निमंत्रित कले होते. त्यांनीही विचार स्वातंत्र्य नसणाऱ्या या संमेलनात आपण सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतली असून, समविचारी मित्रांना सोबत घेऊन संमेलनस्थळी प्रवेशद्वारासमोर बसून निषेध करणार असल्याचे आयोजकांना लेखी कळविले आहे. साहित्याचा एक अभ्यासक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणे आजच्या क्षणी मला योग्य वाटते. नयनतारा सेहगल यांना पुन्हा सन्मानाने बोलावले तरच मी संमेलनाच्या मंचावर येईन, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
कोल्हापुरातील कवी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांना यवतमाळ येथे होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनात ११ जानेवारीला होणाऱ्या निमंत्रितांच्या कविसंमेलनासाठी निमंत्रित केले होते. मात्र, नयनतारा सेहगल यांच्यासारख्या भारतीय पातळीवरील लेखिकेला संमेलनाचे उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण महामंडळाने मागे घेतल्यामुळे त्यांनी या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त करून या संमेलनात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
यासंदर्भातील लेखी पत्र त्यांनी महामंडळाच्या आयोजकांना पाठविले आहे. भारतीय संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्कच आपण नाकारत असाल, तर व्यक्तीश: मला या संमेलनात सहभागी व्हायची अजिबात इच्छा नाही. नयनतारा सेहगल यांच्याशिवाय या संमेलनात मी सहभागी होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी निषेध केला आहे.
पाठविलेला लेख घेतला मागे
शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक नंदकुमार मोरे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. ‘अक्षरयात्रा’चे संपादक विलास चिंतामण देशपांडे यांनी स्मरणिकेसाठी मोरे यांच्याकडून ‘समाजभाषा विज्ञान आणि मराठी’ या विषयावर लेख मागविला होता, तो त्यांनी मागे घेत असल्याचे पत्र संपादकांना पाठविले आहे.
शब्दाला घाबरणाऱ्या सरकारचा निषेध
आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी तीव्र शब्दांत या प्रकाराचा निषेध केला आहे. नयनतारा सेहगल यांच्या बाबतीत जे काही सुरू आहे, ते मराठी माणसाला मान खाली घालायला लावणारे आहे. त्यांचे विचार सोयीस्कर नाहीत म्हणून येऊ नका म्हणून सांगणे म्हणजे त्यांचाच नव्हे, तर अतिथ्यशील मराठी जनतेचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली आहे.