‘लोकमत’तर्फे छायाचित्र स्पर्धेेचे आयोजन
By admin | Published: August 11, 2015 11:45 PM2015-08-11T23:45:24+5:302015-08-11T23:45:24+5:30
जागतिक छायाचित्रण दिन : चेतना संस्थेला मदत
कोल्हापूर : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ‘लोकमत’ आणि ‘राजमल लखीचंद ज्वेलर्स’ यांच्या विद्यमाने १९ व २० आॅगस्ट रोजी छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम चेतना अपंगमती विकास संस्थेला देण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवनच्या कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनासाठी ‘ग्लोबल-लोकल टुरिझम’ आणि ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ असे दोन विषय दिले आहेत. हौशी आणि व्यावसायिक अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार असून, दोन्ही गटांतील प्रथम क्रमांक विजेत्याला कॅमेरा आणि तीन हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक विजेत्याला अनुक्रमे दोन हजार रुपये व एक हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी छायाचित्रांची साईज १२ बाय १८ इंंच असावी व छायाचित्राला पांढऱ्या रंगातील १४ बाय २० माऊंट असावेत. छायाचित्रास योग्य ते शीर्षक असावे, छायाचित्र ओरिजिनल असावे, त्यावर संगणकीय काम केलेले नसावे व त्यामागे स्पर्धकाने स्वत:चे नाव लिहिणे आवश्यक आहे.
छायाचित्र स्पर्धेत निवडण्याचा अधिकार निवड समितीचा असणार आहे व निवडलेली छायाचित्रेच प्रदर्शनात लावली जातील. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. इच्छुकांनी आपली छायाचित्रे १७ तारखेपर्यंत लोकमत कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे जमा करावीत. अधिक माहितीसाठी ०२३१-६४१७०७, ०८ तसेच प्रियांका : ८६००३७२२०१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)