कोल्हापूरमध्ये विभागीय साहित्य संमेलन २० पासून, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व कनवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:36 PM2018-01-12T13:36:13+5:302018-01-12T13:42:26+5:30
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने शनिवार (दि.२० व रविवारी (दि.२१) विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलन समिती प्रमुख डॉ. संजीवनी तोफखाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने शनिवार (दि.२० व रविवारी (दि.२१) विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलन समिती प्रमुख डॉ. संजीवनी तोफखाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
राम गणेश गडकरी हॉलमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उदघाटन सायंकाळी पाच वाजता मराठी विश्वकोष महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष डॉ. ल. रा. नसिराबादकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र गोळे, मनस्विनी प्रभूणे यांची उपस्थिती असेल तत्पूर्वी दुपारी अडीच वाजता करवीर नगर वाचन मंदिर येथून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.
रविवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता सुनील पाटील यांचे कादंबरी अभिवाचन व मुलाखत होईल. दहा वाजता सामाजिक जीवनात ग्रंथालयाचे स्थान या विषयावर, साडे अकरा वाजता परिसरातील साहित्यिक व साहित्य संस्था या विषयावर परिसंवाद होईल.
दुपारी अडीच वाजता कविसंमेलन होणार आहे. सायंकाळी पाच वाजता स्वामी विद्यानृसिंह सरस्वती यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होईल. तरी रसिकांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
परिषदेस डॉ. रमेश जाधव, अपर्णा वाईकर, मनिषा वाडीकर, अभिजीत भोसले, सतीश कुलकर्णी, अश्विनी वळीवडेकर, उदय सांगवडेकर, नंदकुमार मराठे, प्रशांत वेल्हाळ उपस्थित होते.