Kolhapur: ‘केशवराव’चा मूळ ढाचा शाबूत, मागील बाजूचा काही भाग खराब; स्ट्रक्चरल ऑडिटमधून स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:49 PM2024-08-27T13:49:03+5:302024-08-27T13:50:31+5:30

आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही

Original dacha of Keshavrao Bhosle Theatre intact, part of reverse damaged; Clear from structural audit | Kolhapur: ‘केशवराव’चा मूळ ढाचा शाबूत, मागील बाजूचा काही भाग खराब; स्ट्रक्चरल ऑडिटमधून स्पष्ट

Kolhapur: ‘केशवराव’चा मूळ ढाचा शाबूत, मागील बाजूचा काही भाग खराब; स्ट्रक्चरल ऑडिटमधून स्पष्ट

कोल्हापूर : ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाची वरील बाजू जळून खाक झाली असली तरी सुदैवाने मूळ ढाचा शाबूत असल्याचे आतापर्यंत झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून स्पष्ट होत आहे. नाट्यगृहाची मागील बाजूकडील काही भाग मात्र खराब झाला असून, तो नवीन बांधकामावेळी उतरवून घ्यावा लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

येथील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला दि. ८ ऑगस्टच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. पोलिस विभागाच्या फॉरेन्सिक विभागाकडून त्याची चौकशी सुरू आहे. महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने ही आग तांत्रिक कारणांनी लागली नसल्याचे म्हटले असल्याने आग कशी लागली? की कोणी माथेफिरूने लावली? या प्रश्नांवर पोलिसांच्या नजरा खिळल्या आहेत.

नाट्यगृह आहे त्याच ठिकाणी आणि जसे होते तसे उभे करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्यामुळे महापालिकेने नाट्यगृहाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यांनी ताज हॉटेलचे स्ट्रक्चरल ऑडिट केले त्याच कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील स्ट्रक्चरल ऑडिटचे काम पूर्ण केले. नाट्यगृहाच्या आतील बाजूस असलेला मलबा हलविण्यास फॉरेन्सिक विभागाने मनाई केल्यामुळे आतील बाजूने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात अडथळे आले आहेत. त्यामुळे मलबा हटविल्यानंतर पुन्हा ऑडिटचे काम सुरू केले जाणार आहे.

आतापर्यंत झालेल्या ऑडिटमधून इमारतीचा मूळ ढाचा शाबूत असल्याचे स्पष्ट होत आहे. भिंतीचे दगड, चुन्याचे बांधकाम अजूनही मजबूत असल्याचे सांगण्यात येते. परंतु, जेथून आग लागली त्या मागील बाजूकडील भिंतीला थोडे नुकसान पोहोचले आहे. त्यामुळे भविष्यात काही भाग उतरवून घ्यावा लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. जर मूळ ढाचा व्यवस्थित आणि मजबूत असेल तर जसे होते तसे नाट्यगृह उभारण्यास कोल्हापूरकरांच्या मागणीत काही अडचणी येणार नाहीत.

महापालिकेचा विम्यासाठी दावा

महापालिकेने नाट्यगृहावर २०१८ पासून सहा कोटी १८ लाखांचा विमा उतरवला असून, प्रतिवर्षी ५८ हजार रुपये याप्रमाणे हप्ते भरले आहेत. त्यामुळे घटना घडल्यानंतर पालिका प्रशासनाने विमा कंपनीकडून शंभर टक्के भरपाई मिळावी म्हणून दावा केला आहे. त्यानुसार विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा भेट देऊन जळीत प्रकाराची पाहणी केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेकडे काही कागदपत्रांची मागणी केली असून, ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मलबा हटविण्यास मागितली परवानगी

नाट्यगृहाच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात मलबा पडला असून, तो हटविण्यास परवानी द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाने पोलिस अधीक्षक व फॉरेन्सिक विभागाकडे केली आहे. मलबा हटविल्याशिवाय आतील बाजूने स्ट्रक्चरल ऑडिट होणार नसल्याचे पोलिसांना कळविले आहे.

Web Title: Original dacha of Keshavrao Bhosle Theatre intact, part of reverse damaged; Clear from structural audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.