अनोखा उपक्रम; अनाथ मुली, महिलांना मिळणार माहेरचा आनंद, रत्नागिरीत माहेरवाशीण मेळाव्याचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 11:55 AM2022-05-05T11:55:30+5:302022-05-05T11:55:55+5:30
हा माहेरवाशीण मेळावा चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. हा राज्यातलाच नाही तर देशातील पहिलाच असा अनाथ मुलींचा माहेरवाशिणींचा मेळावा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर : अनाथ मुली, महिला व त्यांची मुले यांना माहेरपण अनुभवता यावे यासाठी चिखलगाव येथील लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (लोकसाधना) व पुण्यातील सनाथ वेल्फेअर फाउंडेशनतर्फे १३ ते १७ मे दरम्यान माहेर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा माहेरवाशीण मेळावा चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. हा राज्यातलाच नाही तर देशातील पहिलाच असा अनाथ मुलींचा माहेरवाशिणींचा मेळावा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बालगृहातील (अनाथालयातील) माजी संस्थाश्रयी मुले-मुली अनाथ आणि निराश्रित असल्याने त्यांना १८ वर्षांनंतर 'माहेर' म्हणून कोणतेच हक्काचे ठिकाण नाही. माहेरचा आनंद या मुली कधीच उपभोगू शकत नाही. बालगृहात वाढल्यानंतर संस्थेने एकदा लग्न लावून दिले की या मुली कधीच आपल्या संस्थेच्या प्रांगणात माहेरी आल्यासारखा आनंद घेऊ शकल्या नाहीत.
शासकीय नियमांमुळे त्या आपल्या बालगृहात माहेर म्हणून एक दिवसही राहू शकत नाहीत. अठरा वर्षांनंतर त्या त्यांच्या बालगृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांना कोणतेही हक्काचे, विश्रांतीचे, आश्वस्त करणारे 'माहेर' म्हणून विसावा ठरू शकणारे हक्काचे ठिकाण नाही. अशा अनाथ मुली आणि निराश्रित, एकल पालक असलेल्या, लग्नानंतरचे कुटुंब असूनही कौटुंबिक कलहात एकटे पडलेल्या महिला आज राज्यात खूप आहेत. त्यांनाही चार दिवस का होईना पण सुट्टीला आपल्या माहेरी जावेसे वाटते; पण त्यांच्यासाठी अशी कोणतीच हक्काची अशी जागा नाही. त्यांच्या आयुष्यातील ही एक मोठी पोकळी भरून काढण्यासाठीच हा मेळावा होत आहे.
या मेळाव्यात नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ, पंढरपूर, मुंबई, पुणे अशा सर्व जिल्ह्यातील माजी संस्थाश्रयी विवाहित, अविवाहित, एकल पालक असलेल्या मुली, महिला त्यांची बाळं अशा शंभर ते दीडशे महिला सहभागी होतील असा अंदाज आहे. या माहेरवाशिणींच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल, ट्रस्टच्या 'लोकनिर्माण भवन' वसतिगृहात होणार आहे.
मदतीचे आवाहन
हा माहेरवाशीण आनंद मेळावा यशस्वीपणे पार पडावा, यासाठी दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. आपापल्या परीने मेळाव्यासाठी आर्थिक सहकार्य करता येईल तेवढे करावे. संपर्कासाठी सनाथ संस्थेच्या संचालिका गायत्री पाठक- पटवर्धन,पुणे (7776043131), प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर (9881250093) यांना संपर्क करू शकता.