कोरोना निवळल्यानंतरच महापालिकेसह अन्य निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:57+5:302021-07-12T04:16:57+5:30
कोल्हापूर : कोरोना काळात कोणत्याही निवडणुका घेतल्या जाणार नसल्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे निवळल्याशिवाय महापालिकेसह कोणत्याही ...
कोल्हापूर : कोरोना काळात कोणत्याही निवडणुका घेतल्या जाणार नसल्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे निवळल्याशिवाय महापालिकेसह कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मराठा आरक्षण आता केंद्र सरकारच्या हातात असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
रविवारी खासगी दौऱ्यानिमित्ताने कोल्हापुरात आलेल्या तनपुरे यांनी शासकीय विश्रामगृहावर काही काळ मुक्काम केला. यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य शासनाची निवडणुका, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि महाविद्यालयीन फीच्या संदर्भातील विषयांवर भूमिका मांडली.
निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना तनपुरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी होती, पण कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने ते अनिश्चित काळासाठी पुढे गेले. जोपर्यंत हे वातावरण पूर्णपणे निवळत नाही, तोवर कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेण्याच्या विचारात सरकार नाही. मराठा आरक्षणाबाबतीत विचारलेल्या प्रश्नावर १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे हा विषय आता केंद्र सरकारच्या कक्षेत गेला आहे. राज्य सरकारच्या अखत्यारित जितके आहे, तितके केले आहे,अजूनही केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच घटना दुरुस्तीचे विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबतीतील निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर यावर अजून अभ्यास सुरु आहे. राज्य सरकार म्हणणे मांडण्याची तयारी करत असल्याचे सांगितले.
शाळा, महाविद्यालयीन फीच्या संदर्भात पालकांच्या भावना समजून घेतल्या आहेत. अनावश्यक फी कपातीसंदर्भात राज्य शासन गांभीर्याने विचार करत असून, लवकरच धोरण जाहीर केले जाईल, असेही तनपुरे यांनी सांगितले.