‘नाईट लँडिंग’मधील अन्य अडथळे दूर करणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:16+5:302021-04-02T04:23:16+5:30
कोल्हापूर : नियोजनबद्ध आणि अधिकारी, लोकप्रतिनिधींनी सामूहिकपणे प्रयत्न केल्यास कोल्हापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या नाईट लँडिंगमधील अडथळे दूर ...
कोल्हापूर : नियोजनबद्ध आणि अधिकारी, लोकप्रतिनिधींनी सामूहिकपणे प्रयत्न केल्यास कोल्हापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या नाईट लँडिंगमधील अडथळे दूर करणे शक्य आहे. सध्या असलेली १३७० मीटरची धावपट्टी पहिल्या टप्प्यात १९०० मीटर झाल्यास केंद्र सरकारच्या उडान योजनेतील चौथ्या टप्प्यातून काही नवीन मार्गावरील सेवा कोल्हापूरमधून सुरू होऊ शकतात.
धावपट्टी विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६४ एकर जमिनीची आवश्कता आहे. त्याबाबत भूसंपादनाबाबत मुंबईत बुधवारी (दि. ३१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा झाली आहे. त्यातील चर्चेनुसार भूसंपादनाबाबत पाहणीसाठी एक पथक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून लवकरच कोल्हापूरला पाठविण्यात येणार आहे. भूसंपादनाप्रमाणेच असलेले अन्य अडथळे आणि ते दूर करण्याबाबतच्या काही उपायांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला.
या अडथळ्यांवर काय करता येईल?
१) फनेल एरियातील अडथळे : स्पष्टपणे दृश्यता (व्हिजिबिलिटी) येण्यासाठी विमानतळाच्या फनेल एरियामध्ये काही अडथळे आहेत. त्यात केआयटी कॉलेज, वैभव हौसिंग सोसायटी परिसरातील काही इमारतींचा भाग, पाण्याची टाकी यांचा समावेश आहे. नाईट लँडिंग सुविधेसाठीदेखील हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. संबंधित परिसरातील नागरिकांशी चर्चा करून सामंजस्याने हे अडथळे दूर करता येतील.
२) हाय टेन्शन पॉवर लाईन : ही उच्च दाबाची विद्युतवाहिनी स्थलांतरित करण्याचा मुद्दा पुढे आला आहे. हे काम करण्यासाठी निधी उपलब्ध होण्यात अडचण असल्याचे दिसते. त्यावर या विद्युतवाहिनीच्या दुसऱ्या बाजूने विमानाचे टेकऑफ, लँडिंग करण्याचा पर्याय आहे.
३) ऑल वेदर लाईट : नाईट लँडिंगसह सर्व ऋतूंमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी ऑल वेदर लाईट, अप्रोच लाइटिंग आवश्यक आहे. या सुविधेसाठी धावपट्टी विस्तारीकरणाचे काम लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.
४) अतिरिक्त भूसंपादन : धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगीच्या बाजूकडील ६४ एकर अतिरिक्त भूसंपादन होणे गरजेचे आहे. ही भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाकडून गतीने व्हावी.
५) मोठी विमाने उतरण्यातील अडचण : एटीआर ७२, एम्ब्रररसारखी विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरण्यासाठी किमान १९०० मीटरची धावपट्टी असणे आवश्यक आहे. सध्या असलेली १३७० मीटरची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत वाढविल्यास मोठी विमाने या ठिकाणी उतरविता येतील. त्यामुळे उडान योजनेच्या चौथ्या टप्प्यात नव्या मार्गावरील सेवा कोल्हापूरमधून सुरू करता येईल.
चौकट
दोन महिन्यांत अप्रोच लाईट्स
गेल्या महिन्यात खासदार संभाजीराजे आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुज अग्रवाल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेतली. त्यामध्ये कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत कार्यन्वित करण्यासह नाईट लँडिंग सुविधेसाठी लागणारी ॲप्रोच लाईट्स लावण्याचे काम दोन महिन्यांत प्राधान्याने पूर्ण करणे. अतिरिक्त ६४ एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया विहित कालावधी निश्चित करून पूर्ण करण्याचा निर्णय झाला होता.
प्रतिक्रिया
विमानतळ विस्तारीकरणातील अडथळे पाहता, ते दूर करणे शक्य आहे. त्याबाबत या विस्तारीकरणाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री प्रयत्न करण्याऐवजी नियोजनबद्ध कामाला प्राधान्य द्यावे. प्रत्येक काम पूर्णत्वाची मुदत निश्चित करावी. त्या दृष्टीने नियोजन करावे.
- विज्ञानंद मुंढे, सदस्य, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स