औषध खरेदीसाठी अन्य अधिकारीही जबाबदार : प्रकाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:56 AM2018-03-14T00:56:28+5:302018-03-14T00:56:28+5:30

 Other officials responsible for the purchase of the drug: Prakash Patil | औषध खरेदीसाठी अन्य अधिकारीही जबाबदार : प्रकाश पाटील

औषध खरेदीसाठी अन्य अधिकारीही जबाबदार : प्रकाश पाटील

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सीईओं’च्या भूमिकेकडे लक्ष

कोल्हापूर : आरोग्य विभागाची औषध खरेदी एकटा जिल्हा आरोग्य अधिकारी करू शकत नाही. औषधनिर्माण अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचीही यामध्ये जबाबदारी येते. तसेच आरोग्य, स्थायी आणि सर्वसाधारण सभेतही त्याची मंजुरी होते. वित्त विभागही यामध्ये येतो. त्यामुळे ही सामूहिक जबाबदारी असल्याचा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत सादर केला आहे.

जादा औषध खरेदीबाबत तक्रारी झाल्यानंतर प्राथमिक अहवालाची छाननी करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी डॉ. प्रकाश पाटील आणि औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगुले यांना नोटिसा काढल्या होत्या. चौगुले यांनी सोमवारी (दि. १२) आपला खुलासा सादर केला होता.

मंगळवारी डॉ. प्रकाश पाटील यांनीही आपला खुलासा मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर करण्यासाठी टपालामध्ये दिला. बुधवारी तो डॉ. खेमनार यांच्याकडे जाईल. त्यानंतर डॉ. पाटील यांचा हा खुलासा मान्य करायचा की नाही, याचा निर्णय डॉ. खेमनार घेणार आहेत. तसेच पुढील कारवाईची प्रक्रिया काय राहील, हेदेखील यावर ठरणार आहे.
याबाबत डॉ. प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा कारभार एकटा अधिकारी पाहू शकत नाही. औषध खरेदी ही शासन दरसूचीनुसार झाली असून, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून जी औषधांची मागणी आली, त्याला अनुसरूनच ही खरेदी करण्यात आली आहे. औषधनिर्माण अधिकारी बी. डी. चौगुले आणि आधीचे व सध्याच्या अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नांद्रेकर व डॉ. उषादेवी कुंभार यांच्यावरही ही जबाबदारी येते.

आम्ही खरेदीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर आरोग्य समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेतून तो मंजूर केला जातो. वित्त विभागाच्या विविध टेबलांवरून हा प्रस्ताव फिरतो आणि मग त्यावर कार्यवाही होते. त्यामुळे या सगळ्यासाठी मी एकटाच जबाबदार कसा? असा प्रश्नच डॉ. पाटील यांनी उपस्थित केला.

दोघांनीही  नाकारला घोटाळा
डॉ. प्रकाश पाटील आणि बी. डी. चौगुले या दोघांनीही आपले खुलासे दिले आहेत. दोघांनीही घोटाळा झाल्याचे आणि त्यामध्ये आपलीच जबाबदारी असल्याचे नाकारले आहे. अशा परिस्थितीत डॉ. खेमनार या दोघांचा खुलासा मान्य करणार की तो शासनाकडे कारवाईसाठी पाठवणार, याचा निर्णय दोन दिवसांत होणार आहे.

Web Title:  Other officials responsible for the purchase of the drug: Prakash Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.