शहरातील ८५ टक्के पॉस मशीन बंद ; अन्यथा आॅफलाईन धान्य विक्रीची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 05:19 PM2020-03-12T17:19:31+5:302020-03-12T17:21:04+5:30
गेल्या काही दिवसांपासून रेशन धान्य दुकानांतील पॉस मशीन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या मशीनमधील तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्त करून सेवा पूर्ववत करा. अन्यथा येत्या दोन दिवसांत आॅफलाईन धान्य विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी रेशन बचाव समितीने शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे-जाधव यांच्याकडे बुधवारी केली.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून रेशन धान्य दुकानांतील पॉस मशीन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या मशीनमधील तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्त करून सेवा पूर्ववत करा. अन्यथा येत्या दोन दिवसांत आॅफलाईन धान्य विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी रेशन बचाव समितीने शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे-जाधव यांच्याकडे बुधवारी केली.
शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने पॉस मशीन (पार्इंट आॅफ सेल) बोटाचा ठसा उमटवून ओळख पटवूनच रेशन दुकानदारांना प्रमाणभूत धान्य लाभार्थ्यांस द्यावे लागते. ही मशीन भाड्याने घेऊन रेशन दुकानदारांना चालवण्यास दिली आहेत. त्यात १ मार्चपासून शहरातील ८५ टक्के रेशन दुकानांतील पॉस मशीनमध्ये बिघाड झाला आहे.
याबाबत तक्रार करूनही ती अद्याप दुरुस्त करून दिली जात नाहीत. त्यामुळे ग्राहकांच्या रोषास दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या मशीनमधील बिघाड त्वरित दूर करून मशीन ताब्यात द्यावीत. अन्यथा आॅफलाईन पद्धतीने धान्य विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली.
यावेळी शहर पुरवठा अधिकाऱ्यांनी पॉस मशीन पुरवणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींना कार्यालयात बोलावून समज दिली. या प्रतिनिधीने आधार सर्व्हर डाऊन असल्याने हा दोष निर्माण झाला आहे. तो दुरुस्तीकरिता दोन दिवसांचा अवधी लागणार असल्याचे सांगितले.
समितीचे नेते चंद्रकांत यादव यांनी दोन दिवसांत हा बिघाड दुरूस्त झाला नाही, तर आॅफलाईन धान्य विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी समितीच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, गजानन हावलदार, राजेश मंडलिक, साताप्पा भास्कर, तानाजी चव्हाण, अशोक सोलापुरे, अरुण शिंदे, दीपक शिराळे, बाळू कांबळे, आदी उपस्थित होते.
बायोमेट्रीक पद्धत बंद करा
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासन, खासगी कंपन्यांनी बायोमेट्रीक हजेरी बंद केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रेशन धान्य दुकानातील पॉस मशीनचा वापर बंद करावा, अशीही मागणी रवींद्र मोरे यांनी केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू, असे उत्तर शहर पुरवठा अधिकारी शिंदे-जाधव यांनी दिले.