अन्यथा कुलगुरूंना घेराव, ठिय्या आंदोलन करणार, ‘अभाविप’चा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:15 PM2019-03-18T16:15:40+5:302019-03-18T16:17:17+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभात दुबार छपाई केलेल्या पदवी प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. २२) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करावा. या दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करावा, अन्यथा कुलगुरुंना घेराव घालण्यात येईल. ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) प्रांतसहमंत्री साधना वैराळे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभात दुबार छपाई केलेल्या पदवी प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. २२) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करावा. या दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करावा, अन्यथा कुलगुरुंना घेराव घालण्यात येईल. ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) प्रांतसहमंत्री साधना वैराळे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
वैराळे म्हणाल्या, या पदवी प्रमाणपत्रांतील सहीचा गोंधळ, दुबार छपाईमधील आर्थिक नुकसानाबाबत अभाविपने दि. १६ जुलै २०१८ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवेळी आंदोलन केले. त्यामध्ये या प्रमाणपत्राबाबत झालेल्या आर्थिक नुकसानाबाबत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली.
या समितीच्या अहवालाबाबत गेल्या आठवड्यात आम्ही कुलगुरुंकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी अहवाल सादर झाला असून दि. २२ मार्चला होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याचे सांगितले.
या दिवशी अहवाल सादर झाला नाही, तर आम्ही आंदोलन सुरू करणार आहे. दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करून तो विद्यापीठ निधीमध्ये जमा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. या पत्रकार परिषदेस अभाविपचे प्रांतसहमंत्री प्रविण जाधव, कोल्हापूर महानगरमंत्री सोहम कुऱ्हाडे उपस्थित होते.
प्रशासनाची दिरंगाई
या अहवालाबाबत अभाविपने वारंवार पाठपुरावा केला. पत्रव्यवहार केला, तरीही विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात दिरंगाई केली असल्याचे वैराळे यांनी सांगितले.