...नाही तर आम्ही सरकार घालवू
By admin | Published: May 25, 2014 12:56 AM2014-05-25T00:56:26+5:302014-05-25T01:16:39+5:30
‘एलबीटी’प्रश्नी व्यापार्यांचा इशारा : सांगलीत उद्या पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार्यांचा मेळावा
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत जशी व्यापार्यांनी ताकद दाखवली तशी ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवू,असे सांगत ‘एलबीटी घालवा, नाही तर आम्ही तुम्हाला घालवू’असा निर्वाणीचा इशारा व्यापार्यांनी आज, आघाडी सरकारला दिला. कोल्हापूर उद्योजक व व्यापारी महासंघाची बैठक आज (शनिवार) स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये सायंकाळी झाली. अध्यक्षस्थानी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगांवकर होते. राज्य शासनाने मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) एक टक्का वाढवून विनापर्याय एलबीटी रद्द करावा, अशी मागणीही यावेळी व्यापार्यांनी केली. दरम्यान, सांगली येथे सोमवारी, दि.२६ होणार्या पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार्यांच्या मेळाव्याला कोल्हापूर शहरातून ५० हून अधिक व्यापारी प्रतिनिधींनी जाण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेतला. निमंत्रक सदानंद कोरगांवकर म्हणाले, गेली साडेतीन वर्षे स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचा लढा सुरू आहे. इतर राज्यांत जकात सुरू आहे, मात्र महाराष्ट्रात जकात रद्द करून राज्य शासनाने एलबीटी सुरू केला. त्याला राज्यातील व्यापार्यांचा तीव्र विरोध आहे. व्हॅटमध्येच एक टक्का वाढवून एलबीटी रद्द करावा,अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवू,असे कोरगांवकर यांनी सांगून २ जूनला राज्य अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन दिले असल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले. गणेश बुरसे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत व्यापार्यांनी ताकद दाखविली आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या ३३ खासदारांचा पराभव झाला आहे. याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घ्यावा. बैठकीस सुरेश गायकवाड (पतौडी), सुधीर आपटे, संजय रामचंदानी आदींनी मते व्यक्त केली. बैठकीत व्यापारी व उद्योजकांनी एलबीटीला जोरदार विरोध केला. अमर क्षीरसागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बैठकीस प्रवीणभाई शहा, बाबा महाडिक, मधुकर हरेल यांच्यासह व्यापारी, उद्योजक उपस्थित होते . सचिन शहा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)