....अन्यथा कोल्हापुरी ‘फुटबॉल ’ हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:31 AM2018-03-15T01:31:33+5:302018-03-15T01:31:33+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या अपप्रवृत्तीला वेळीच रोखले नाही. तर कोल्हापूरचा ‘फुटबॉल’ हद्दपार होईल,
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या अपप्रवृत्तीला वेळीच रोखले नाही. तर कोल्हापूरचा ‘फुटबॉल’ हद्दपार होईल, अशी भीती फुटबॉल शौकिनांमधून व्यक्त केली जात आहे. या घटनेबद्दल अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
राजाराम छत्रपती यांनी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन १९४०मध्ये स्थापन केली. या असोसिएशनमुळे या करवीरनगरीत फुटबॉलसह अन्य खेळांना चालना मिळाली. विशेष म्हणजे, केळवकर लीग फुटबॉल (आताची के. एस. ए. लीग स्पर्धा) स्पर्धेमुळे कोल्हापूरचा फुटबॉल देशाच्या नकाशावर आला. त्यात अनेक नामवंत खेळाडू या मातीतून तयार झाले. सद्य:स्थितीत निखिल कदम (मोहन बागान), सुखदेव पाटील (२३ वर्षांखालील भारतीय संघ गोलरक्षक), अनिकेत जाधव (१७ वर्षांखालील भारतीय संघ, स्ट्राईकर) असे तीन मोहरे चमकदार कामगिरी करीत आहेत. यासह अनेक नामवंत खेळाडू राज्याला तसेच देशाला दिले आहेत; पण या फुटबॉलपटूंच्या खाणीलाच सुरुंग लावण्याचे काम काही अपप्रवृत्ती करू लागल्या आहेत. यात प्रथम सामन्यादरम्यान पंचांचा निर्णय अमान्य करीत समर्थकच हुल्लडबाजी करणे, पंचांंना अश्लील शिवीगाळ करणे, खेळाडूंमध्ये मैदानातच मारामारी होणे, असे प्रकार घडू लागले. मंगळवारी (दि. १३) फुटबॉलची मातृसंस्था असलेल्या के. एस. ए. कार्यालयालाच एका संघाच्या समर्थकांनी चक्क टाळे ठोकले. त्यामुळे या अपप्रवृत्तीला वेळीच पायबंद न घातल्यास ‘कोल्हापुरी फुटबॉल’ कधी हद्दपार होईल, हे कळणार नाही. संस्थेनेही संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शौकिनांकडून होत आहे.
मातृसंस्थेला टाळे ठोकण्याची कृती निश्चितच निंदनीय आहे. कारवाईबाबत के. एस. ए.च्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.
- माणिक मंडलिक, सचिव, कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन