अन्यथा... रॉकेलच्या टँकरसह घर पेटवू
By admin | Published: November 21, 2014 11:55 PM2014-11-21T23:55:13+5:302014-11-22T00:07:06+5:30
टँकर परतला : इटेतील स्वस्त धान्य दुकानदाराबाबत ग्रामस्थ आक्रमक
आजरा : इटे (ता. आजरा) येथे स्वस्त धान्य दुकानदाराकडून रॉकेलसह इतर धान्य स्वीकारण्याची ग्रामस्थांची मानसिकता नसताना, स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करावा, यासाठी ग्रामस्थ ठाम असतानाही पुन्हा त्याच धान्य दुकानदाराकडे रॉकेल वितरणासाठी उतरवत असताना गावातील स्त्री-पुरुष शिधापत्रिकाधारकांनी जबरदस्तीने रॉकेल उतरवल्यास ज्या ठिकाणी रॉकेल उतरवणार त्या घरासह टँकर पेटविण्याचा इशारा दिल्याने अखेर रॉकेल न उतरवताच टँकर परतला.
इटे (ता. आजरा) येथील स्वस्त धान्य दुकानदार मंगल शिवाजी कांबळे यांचा दुकान परवाना रद्द करून तो दुसऱ्या व्यक्तीस द्यावा, यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी मोर्चासह तहसीलदारांकडे तक्रारी दिल्या होत्या. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आजरा येथे इटे येथील शिधापत्रिकाधारकांसाठी रॉकेल व धान्य वितरणाची व्यवस्था केली होती. दरम्यान, कांबळे यांनी याप्रकरणी विभागीय आयुक्त (कमिशनर) यांच्याकडे दादा मागितली. कमिशनर यांनी कांबळे यांच्या बाजूने निर्णय दिल्याने शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास रॉकेल उतरवण्यासाठी टँकर इटे येथे आला होता.
दरम्यान, पुन्हा जुन्याच दुकानदाराकडे रॉकेल वितरणासाठी उतरवले जात असल्याचे लक्षात येताच गावातील महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी कांबळे, त्यांचे पती व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही ग्रामस्थांनी बॅरल व अन्य साहित्य पळवून नेले, तर रॉकेल जबरदस्तीने उतरवलेच तर टँकरसह संबंधित घर पेटवण्याचा इशाराही दिला.अल्पावधीतच पोलिसांसह तालुका पुरवठा अधिकारी रामलिंग तराळ, तलाठी महादेव देसाई, आप्पासाहेब पाटील घटनास्थळी हजर झाले. यानतंर ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीवेळी दुकानदार परवाना रद्द करून, बदलल्याशिवाय रॉकेलसह अन्य धान्य उतरवू देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने रॉकेल न उतरताच तालुका पुरवठा अधिकाऱ्यांसह टँकर परतला.
यावेळी सरपंच विलास पाटील, संजय शेणवी, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी पाटील, बाळू यादव, माया पाटील, अनुसया तेजम, शारूबाई फगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राजकीय सूडबुद्धीने तक्रार
या घटनेबाबत बोलताना धान्य दुकानदार मंगला पाटील यांनी सरपंच विलास पाटील हे केवळ राजकीय सूडबुद्धीने ग्रामस्थांची ढाल करीत आहेत.कायदेशीर मार्गाने आपणाला परवानगी मिळाली आहे व त्यांनीही कायदेशीर मार्गाने दाद मागावी, असे स्पष्ट केले.
सोमवारी फैसला
तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे या मिटींगनिमित्त कोल्हापूरला गेल्याने या प्रकरणाचा फैसला सोमवारीच होणार आहे.