अन्यथा नवीन वाहने भंगारात जातील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:16 AM2020-02-26T01:16:21+5:302020-02-26T01:17:17+5:30
बी.एस.फोर मानांकन असलेली वाहनांची नोंदणी ३१ मार्च २०२० पर्यंत करावी. त्यानंतर अशा वाहनांऐवजी बी.एस.६ वाहनांचीच नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी अशा वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे करावी लागणार आहे.
कोल्हापूर : वर्षभरात घेतलेल्या बी.एस.फोर वाहनांची नोंदणी या ना त्या कारणाने रखडली असल्यास त्या वाहनांची नोंदणी ३१ मार्च २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत वाहनधारकांना करावी लागणार आहे; अन्यथा ते वाहन भंगारात घालावे लागणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी मंगळवारी दिली.
बी.एस.फोर मानांकन असलेली वाहनांची नोंदणी ३१ मार्च २०२० पर्यंत करावी. त्यानंतर अशा वाहनांऐवजी बी.एस.६ वाहनांचीच नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी अशा वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे करावी लागणार आहे. विशेषत: काही नागरिकांनी फॅन्सी क्रमांकासाठी आपली वाहने अद्यापही नोंदणी केलेली नाहीत. त्यामुळे अशा वाहनधारकांनाही ती वाहने नोंदणी करावी लागणार आहेत. नाही तर अशी वाहने रस्त्यावर फिरवता येणार नाहीत. ती भंगारात घालावी लागणार आहेत.
दुचाकीच अधिक
सद्य:स्थितीत कोल्हापुरात या मानांकनाच्या चारचाकीपेक्षा दुचाकीच अधिक विक्रेत्यांकडे आहेत. त्यामुळे या वाहनांचे करायचे काय असा सवाल आता विक्रेत्यांसमोर आहे.
बी.एस.फोर मानांकन असलेल्या वाहनांची ३१ मार्चपूर्वीच नोंदणी करावी लागेल, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची नोंदणी कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. ही वाहने भंगारात घालावी लागतील.
- डॉ. स्टीव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर.