...अन्यथा गडहिंग्लज विभागातही जनता कर्फ्यू लावावा लागेल : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 06:41 PM2021-05-08T18:41:03+5:302021-05-08T18:44:07+5:30
CoronaVirus HasanMusrif Kolhapur : गडहिंग्लज विभागात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी लोकांनी काळजी घ्यावी.अन्यथा कागलप्रमाणे गडहिंग्लज विभागातही कडक जनता कर्फ्यू लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील जनतेला शनिवारी (८) इशारा दिला.
गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी लोकांनी काळजी घ्यावी.अन्यथा कागलप्रमाणे गडहिंग्लज विभागातही कडक जनता कर्फ्यू लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील जनतेला शनिवारी (८) इशारा दिला.
गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मुश्रीफ म्हणाले, कोरोना बाधितांचा मृत्युदर देशात कोल्हापूरचा अधिक आहे.त्यामुळे लक्षणे दिसताच नागरिकांनी स्वत:हून चाचण्या करून घ्याव्यात. तपासण्या न झाल्यामुळेच रुग्णसंख्या वाढती आहे. तरुणांच्या मृत्युचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे हॉटस्पॉट असणार्या गावात रेडअलर्ट घोषित करुन सर्वांच्या चाचण्या करून घ्याव्यात.
बैठकीस गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, भूदरगडचे प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, गडहिंग्लजचे तहसिलदार दिनेश पारगे,आजऱ्याचे विकास अहिर, चंदगडचे विनोद रणावरे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, डॉ.चंद्रकांत खोत, रामाप्पा करिगार, उदय जोशी, अभय देसाई,आदी उपस्थित होते.
बाधितांच्या प्रमाणात राज्यांना मदत द्या..!
तिसर्या लाटेपूर्वी महाराष्ट्रातील लसीकरण पूर्ण करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे.परंतु, सीरम, पुनावालासह स्फुटनिकच्या लसीचे सर्व अधिकार केंद्राने आपल्याकडे घेतले आहेत. लसीच्या वाटपात हस्तक्षेप न करता केंद्र शासनाने बाधितांच्या प्रमाणात सर्वच राज्यांना सर्वप्रकारची मदत करावी, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांनी केली.
गडहिंग्लज विभागात आणखी ३९० बेड
गडहिंग्लज विभागातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात १८०,चंदगड तालुक्यात ११० व आजरा तालुक्यात १०० असे एकूण आणखी ३९० बेडचे नियोजन करण्यात येईल,असेही मुश्रीफ यांनी सांगितले.