...तर लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार; राजू शेट्टींचे प्रकाश आवाडेंना आव्हान
By राजाराम लोंढे | Published: November 12, 2023 02:31 PM2023-11-12T14:31:58+5:302023-11-12T14:33:13+5:30
टप्याटप्याने तुमच्या दुकानदाऱ्या बाहेर काढू
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: खासदारकीसाठी ऊस दराचे आंदोलन करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे करत आहेत. त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला उर्वरित ४०० रुपये द्यावे व चालू हंगामात प्रतिटन ३५०० रुपये दर द्यावा, लोकसभेच्या निवडणूकीतून मी माघार घेतो. खुशाल तुमच्या मुलाला खासदार करा, असे थेट आव्हान देत तुमची दुकानदारी वेगळी आहे, टप्याटप्याने तुमच्या दुकानदाऱ्या बाहेर काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिला.
राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी चळवळीबद्दल गरळ ओकण्याचे व शेतकऱ्यांच्या मनात भिती निर्माण करण्याचे काम आमदार प्रकाश आवाडे करत आहेत. यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे हे नाकारत नाही. आवाडे जेवढी भिती दाखवतात तेवढी परिस्थिती नाही. ११ नोव्हेंबर अखेर ‘वारणा’ व ‘दूधगंगा’ धरणातील तुलनात्मक पाणीसाठा पाहिला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत १ टीएमसी जादाच पाणी आहे. जर काटकसरीने पाण्याचा वापर केला तर मे अखेर पाणी टंचाई भासणार नाही. परंतु मनात भिती निर्माण करण्यासाठी धरणातील पाणी न सोडता, नद्या कोरड्या पाडणे, जाणीवपुर्वक भारनियमन वाढवणे अशी पिके वाळवण्याचे उद्योग सरकार मधील ही मंडळी करत आहेत.
प्रकाश आवाडे यांची सलगी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी आहे. मी चळवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करतो, असा आरोप आवाडे करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे, चळवळीला राजकारणाचा वास येत असेल तर राज्यातील सर्व कारखान्यांनी मागील हंगामातील ऊसाचे उर्वरित ४०० रुपये व चालू हंगामातील गाळप होणाऱ्या ऊसाला ३५०० रुपये दर द्यावा, लोकसभा निवडणूक लढवत नाही. तुमचे राजकारण तुम्हाला लकलाभ असो, मी चळवळीसाठी जगणारा आणि राजकारण करणार माणूस आहे, तसे तुमचे नसल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला.
पुढचा हंगाम कसा चालवता तेच बघतो
ऊसाची लागण कमी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे, गेल्या वर्षीचे ४०० रुपये मिळाले तरच शेतकरी लागणी करतील. त्यामुळे पुढचा हंगाम कसा पुर्ण क्षमतेने चालवता तेच बघतो, असा इशारा शेट्टी यांनी दिला.