... अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:23+5:302020-12-27T04:17:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चारचाकीतून प्रवास करताना टोलनाक्यावर फास्टटॅग स्टिकर रूपात वाहनांवर टॅग नसेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चारचाकीतून प्रवास करताना टोलनाक्यावर फास्टटॅग स्टिकर रूपात वाहनांवर टॅग नसेल तर दुप्पट टोल आकारणी होणार आहे. त्यामुळे किणी, तासवडे टोलनाक्यँवरून व कर्नाटकातील कोगनोळी नाक्यावरून प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनाधारकांनी फास्टटॅग घेणे बंधनकारक आहे.
देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोलनाक्यांवर भरला जाणारा टोल हा फास्टटॅगद्वारेच भरला जावा, याकरिता केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १ जानेवारी २०२० पासून सक्तीचे करण्यात आले आहे. त्याची कडक अंमलबजावणी त्याच दिवसांपासून होणार आहे. हे स्टिकर रूपातील फास्टटॅग चारचाकीच्या पुढील काचेवर लावावे लागणार आहेत. टॅगमार्फतच टोलनाक्यांवर कॅशलेस व्यवहार होणार आहेत. ज्यांच्याकडे हा फास्टटॅग नाही; पण ते महामार्गावर प्रवास करताना टोलनाक्यावर आले तर त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. कोल्हापुरातून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना किणी आणि तासवडे, तर कर्नाटकात जाणाऱ्या वाहनधारकांना कोगनोळी टोलनाक्यावर हा टॅगचा वापर होणार आहे.
फास्टटॅग काय आहे ?
फास्टटॅग हे एक डिजिटल स्टीकर आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नाॅलाॅजी तंत्रज्ञानावर काम करते. या टॅगमुळे कोणत्याही वाहनाला टोलनाक्यावर थांबावे लागणार नाही. टोलनाक्यावर वेगळ्या प्रकारच्या फास्टटॅग लेन्स बसविण्यात आल्या आहेत. त्याद्वारे त्यातून संँधित वाहनांची टोलची रक्क्म डिजिटल रूपातून कापून घेतली जाणार आहे. यामुळे टोलनाक्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय प्रत्येक वाहनाची डिजिटल नोंद होणार आहे.
कुठे मिळणार हा फास्टटॅग?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रत्येक टोल नाक्याच्या अगोदर ५०० मीटरवर बूथ, आरटीओ कार्यालय, स्टेट बँक, आयसीआयसी बँक, ॲमेझान, पेटीएम, एचडीएफसी, आयडीएफसी फर्स्ट बँक ऑनलाईन आणि ऑफलाईन विकत मिळत आहेत.
टॅगसाठी पाचशे रुपये
नवीन टॅगसाठी शंभर रुपये, तर दोनशे रुपये अनामत ठेव आणि पहिला रिचार्ज म्हणून २०० असे पाचशे रुपये वाहनधारकांना मोजावे लागणार आहेत. हा टॅग पाच वर्षांसाठी पात्र असणार आहे. वाहनमालकाचे छायाचित्र, वाहनाचे आरसी बुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र अथवा पॅनकार्डही केवायसी म्हणून आवश्यक आहे.
कोट
एक जानेवारीपासून किणी, तासवडे टोलनाक्यांवर फास्टटॅगची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी टॅग स्टिकर विविध ठिकाणी सुरू केलेल्या बूथवरून खरेदी करावीत; अन्यथा त्या वाहनांना टोलनाक्यांवर दुप्पट दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
- वसंत पंदरकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर विभाग
(फाॅस्टटॅगचा संग्रहित फोटो वापरावा.)