निधी न देऊन आमचा विश्वासघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 08:48 PM2017-09-28T20:48:33+5:302017-09-28T20:49:13+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापन करताना आमच्यासह सर्व मित्रपक्षांच्या जिल्हा परिषद सदस्यांना भरीव निधी देण्याचे दिलेले आश्वासन न पाळता आमचा विश्वासघात केला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांनी केला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापन करताना आमच्यासह सर्व मित्रपक्षांच्या जिल्हा परिषद सदस्यांना भरीव निधी देण्याचे दिलेले आश्वासन न पाळता आमचा विश्वासघात केला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांनी केला आहे. गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन या सर्वांनी त्यांना आणि खासदार धनंजय महाडिक यांना लेखी पत्र दिले आहे.
या आठ सदस्यांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांमध्ये असणाºया नाराजीला तोंड फुटले असून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर याबाबत आणखी उठाव होण्याची शक्यता आहे. निधी देऊ असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे राहुल आवाडे यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे राहुल आवाडे, वंदना मगदूम, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शुभांगी शिंदे, पद्माराणी पाटील, शिवसेनेचे कुंभोजचे सदस्य प्रवीण यादव, चंदगड विकास आघाडीच्या विद्या पाटील, युवक क्रांती आघाडी चंदगडचे कल्लाप्पाण्णा भोगण आणि अपक्ष रसिका पाटील यांच्या या निवेदनावर स'ा आहेत.
निवेदनामध्ये म्हटले आहे, केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता असल्याने जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ नसतानाही आम्ही पाठिंबा दिला. सर्व ठिकाणी भाजपची सत्ता असल्याने मतदारसंघातील विविध कामे मार्गी लागतील, यासाठी आम्ही पाठिंबा दिला. आमचा विरोध असतानाही केवळ आमच्या नेत्यांच्या सांगण्यावरून आम्ही कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर आपणास पाठिंबा दिला.
परंतु आठ महिने झाले तरी विकासकामांसाठी कोणताही निधी मिळाला नाही; त्यामुळे काही कामे झाली नाहीत. त्यामुळे मतदारसंघांतील ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. पाठिंबा मागताना तुम्ही २५/१२ योजना, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा देखभाल-दुरुस्ती, गावनिहाय पाणी योजना, शिक्षण, कृषी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, ग्रामविकास व इतर योजना, जिल्हा नियोजन व सदस्यांसाठी खास निधी देतो, असे आश्वासन दिले होते.
काय भूमिका घ्यायची ते तुम्हीच सांगा!
मतदारसंघात आठ महिन्यांत कोणतीही कामे न झाल्याने सदस्यांविषयीच संभ्रम निर्माण झाला आहे. तेव्हा मतदारांना आम्ही नेमके काय उत्तर द्यायचे आणि यापुढे आम्ही काय भूमिका घ्यायची, हेदेखील तुम्हीच सांगा, असे या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
आकांक्षा पाटील यांनी सही टाळली
या निवेदनावर शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या सदस्या आकांक्षा पाटील यांचे नाव आहे. मात्र त्यांनी ऐनवेळी या निवेदनावर सही देण्यास नकार दिल्याचे समजते.