शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या रिंगणातून विविध १२ अभ्यासमंडळे बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:57 PM2017-10-25T12:57:19+5:302017-10-25T13:03:22+5:30
कोल्हापूर : एकाही मतदाराची नोंदणी झाली नसल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या रिंगणातून विविध १२ अभ्यासमंडळे बाहेर पडली आहेत. या निवडणुकीच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेतील मंगळवारी २९० अर्जांची विक्री झाली.
या अधिसभा निवडणुकीअंतर्गत विद्यापीठातील एकूण चार विद्याशाखाअंतर्गत ४५ अभ्यास मंडळे आहेत. त्यांतील प्रत्येक अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयीन विभागप्रमुखांमधून तीन विभागप्रमुखांची निवड करण्यासाठी निवडणूक होणार आहे. मात्र, या अभ्यासमंडळांपैकी १२ विषयांच्या अभ्यासमंडळांसाठी एकाही मतदाराची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या विषयांच्या अभ्यासमंडळांची निवडणूक होणार नाही.
यामध्ये फूड सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी, पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण अभियांत्रिकी, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग अॅँड टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर इंजिनिअरिंग, प्राकृत भाषा, मॉडर्न फॉरिन लँग्वेजेस अदर दॅन इंग्लिश, तत्त्वज्ञान, एनसीसी अॅँड एनएसएस, लायब्ररी अॅँड इन्फर्मेशन सायन्स, सोशल वर्क अॅँड अलाइड सब्जेक्टस, व्होकेशनल एज्युकेशन, परफॉर्मिंग अॅँड फाईन आर्टस या विषयांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
या अभ्यासक्रमांसाठी अनेक ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. त्याचा परिणाम हा मतदार नोंदणी न होणाºयावर झाला आहे. संबंधित अभ्यासमंडळे वगळता उर्वरित ३३ अभ्यासमंडळांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी या गटातून ८७७ मतदारांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, मतदार नसल्याने निवडणूक होणार नसलेल्या बारा अभ्यासमंडळांवर सदस्यांची निवड ही नियुक्तीद्वारे होणार असल्याचे समजते.
मागील निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट अर्ज
यावर्षीच्या अधिसभा निवडणुकीसाठी दोन दिवसांत एकूण ४४० अर्जांची विक्री झाली आहे. मागील निवडणुकीमध्ये अर्जविक्रीच्या पूर्ण मुदतीत साधारणत: ३५० अर्जांची विक्री झाली होती. या वर्षीसाठी अर्जविक्री आणि स्वीकृतीसाठी अजून सात दिवसांची मुदत बाकी आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.