जिल्हा बॅँकेच्या यादीतून ८८९ संस्थांना वगळले
By admin | Published: March 3, 2015 12:38 AM2015-03-03T00:38:07+5:302015-03-03T00:43:13+5:30
थकबाकीदारांना फटका : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. बॅँकेशी संलग्न प्राथमिक संस्थांनी दाखल केलेल्या ठरावातील थकबाकीदार, अपुरे भागभांडवल, नोंदणी नाही, अवसायनात काढलेल्या तब्बल ८८९ संस्थांना वगळले आहे. ७,४८७ पात्र संस्था सभासदांची प्रारूप यादी विभागीय सहनिबंधक कार्यालयाने प्रसिद्ध केली.
जिल्हा बॅँकेसाठी गेले महिनाभर संलग्न संस्थांकडून प्रतिनिधींच्या नावे ठराव मागविण्यात आले होते. विविध गटांतील १०,५६२ सहकारी संस्था बॅँकेच्या सभासद आहेत. विकास सेवा संस्था, प्रक्रिया, साखर कारखाना, नागरी बॅँका, पतसंस्था, पाणीपुरवठा, दूध, औद्योगिक संस्था व व्यक्ती सभासद अशा गटांतील सभासद आहेत. ठराव दाखल करण्याच्या मुदतीत ८,३७६ ठराव जिल्हा बॅँकेकडे दाखल झाले होते. यामध्ये विकास सेवा संस्था गटातून सर्वाधिक ठराव दाखल झाले होते. उर्वरित गटातील संस्था थकबाकीदार, अवसायनात, अपुरे भागभांडवल यामुळे ठराव दाखल करू शकल्या नव्हत्या. दाखल ८,३७६ ठरावांची छाननी होऊन प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी करताना अपुरे भागभांडवल, नोंदणी नसलेल्या, अवसायनात काढलेल्या, थकबाकीदार अशा ८८९ संस्थांना वगळले आहे. प्रारूप मतदार यादी सोमवारी विभागीय सहनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र दराडे यांनी प्रसिद्ध केली. या यादीवर १२ मार्चपर्यंत हरकत घेता येणार असून २५ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पाणीपुरवठा, औद्योगिक संस्था सर्वाधिक बाहेर
प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या ८८९ संस्थांपैकी तब्बल ५०९ पाणीपुरवठा, दूध, औद्योगिक संस्था गटातील आहेत. त्यानंतर नागरी बॅँका, पतसंस्था ३१४ आहेत.
कारवाईच्या भीतीने दुबार ठराव कमी
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
करतानाच विभागीय सहनिबंधकांनी दुबार ठराव दाखल करणाऱ्यांवर
कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळेच केवळ २० दुबार ठराव दाखल झाल्याचे समजते.
थकबाकीदार, अपुरे भागभांडवल असणाऱ्या संस्था वगळून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीवर १२ मार्चपर्यंत हरकत घेता येणार आहे. गरज असेल त्या हरकतीवर सुनावणी घेतली जाईल.
- राजेंद्र दराडे, विभागीय सहनिबंधक
गटनिहाय असे
आहेत सभासद
विकास सेवा संस्था - १८३२
सूतगिरणी, साखर कारखाने - ४९७
नागरी बॅँका, पतसंस्था - १२७२
पाणीपुरवठा, दूध, औद्योगिक व व्यक्तिगत - ३८८६