पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेर, गगनबावड्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:17 PM2019-09-05T18:17:31+5:302019-09-05T18:21:57+5:30
: कोल्हापूर शहरात रिपरिप असली तरी डोंगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसत आहे. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून ८५४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सर्वच धरणे ओसंडून वाहत असून, विसर्ग वाढल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेरून वाहत आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रिपरिप असली तरी डोंगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसत आहे. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून ८५४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सर्वच धरणे ओसंडून वाहत असून, विसर्ग वाढल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेरून वाहत आहेत.
गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एका दिवसात तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ सायंकाळी ती ३० फुटांवर पोहोचली आहे. ४२ बंधारे पाण्याखाली गेले असून दोन राज्यमार्ग आणि पाच जिल्हा मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत. नृसिंहवाडीतील दत्तमंदिरात पुन्हा पाणी आले आहे.
शिरोळ, हातकणंगले वगळता जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर शहरात सकाळपासून पावसाची उघडझाप राहिली. सायंकाळी पुन्हा त्याचा जोर वाढू लागला. जिल्ह्यात विशेषत: गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा या तालुक्यांत तुफानी पाऊस सुरू आहे.
कागल, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लजमध्ये जोर नसला तरी पावसात सातत्य आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावड्यात सर्वाधिक १४२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तेथे अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचा सातव्या क्रमांकाचा दरवाजा गुरुवारी दुपारी खुला झाला. खुले झालेल्या दरवाजांची संख्या पाच झाली आहे. सातपैकी पाच दरवाजातून आठ हजार ५४० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. हीच परिस्थिती अन्य धरणांचीही आहे.
जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली असल्याने त्यातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. वारणेतून ११ हजार ७०३, काळम्मावाडी धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. कासारीतून १२००, पाटगावमधून १८७४, कुंभीतून १४००, तुळशीतून ११०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयनेतून ८७ हजार, अलमट्टीतून एक लाख नऊ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
पाणीपातळीत वेगाने वाढ
बुधवारी (दि. ४) सायंकाळी पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी २२ फुटांवर होती. ती गुरुवारी सायंकाळपर्यंत ३० फुटांवर पोहोचली आहे. एका दिवसात पाणीपातळीत तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. पाणी वेगाने वाढत असून पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. ती संख्या काल १६ होती, आज ती ४२ वर पोहोचली आहे.
सोमवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान खात्याने ५ ते ९ आॅगस्ट या काळात कोल्हापूर, साताऱ्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तविला आहे.