Kolhapur: छपाईचा कागद संपला; बँकांनी मुद्रांक शुल्कचे व्यवहार रोखले
By विश्वास पाटील | Published: September 2, 2023 11:44 AM2023-09-02T11:44:04+5:302023-09-02T11:44:23+5:30
विश्वास पाटील कोल्हापूर : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ईएसबीटीआरचे स्टॅम्प छपाई करण्यासाठी लागणारा विशिष्ट प्रकारचा कागद (शासकीय स्टेशनरी) मिळत नसल्याने व्यवहार ...
विश्वास पाटील
कोल्हापूर : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ईएसबीटीआरचे स्टॅम्प छपाई करण्यासाठी लागणारा विशिष्ट प्रकारचा कागद (शासकीय स्टेशनरी) मिळत नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापूरसह अनेक शहरांतील ही स्थिती असून हा कागद मुंबईतून संबंधित यंत्रणेकडून कधी मिळणार याबद्दल बँकांही अनभिज्ञ आहेत.
ईएसबीटीआर (इलेक्ट्रानिक सिक्युअर बँक ॲन्ड ट्रेझरी रिसीट) ही ऑनलाइन नोंदणी शुल्क भरण्याची पद्धत आहे. तारण, गहाण खत, सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्रे, पॉवर ऑफ ॲटर्नी, मृत्युपत्र, दत्तक, बक्षीसपत्र, बँक हमी, विविध प्रकारचे बाँडस, खरेदी पत्र, करार पत्रापासून ते कंपनीच्या नोंदणीपर्यंत जे मुद्रांक शुल्क या पद्धतीने भरता येते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या लक्ष्मीपुरी व ताराबाई पार्क शाखेत हे शुल्क भरून घेण्यात येते परंतु गेल्या दहा दिवसांपासून तिथे हे व्यवहारच कागदाअभावी होत नाहीत.
बँकेच्या शाखांना त्यांच्या मुख्य शाखांकडून हे विशिष्ट प्रकारचे शासकीय कागद उपलब्ध करून दिले जातात. त्यांच्याकडूनच नियमित पुरवठा होत नसल्याने जिल्हास्तरांवरील शाखांमध्ये कागदाची टंचाई आहे. लोकमतने बँक ऑफ महाराष्ट्रच्या लक्ष्मीपुरी शाखेत जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता आम्ही मुंबईला कळवले आहे; परंतु, कागद कधी उपलब्ध होईल याबाबत निश्चित सांगता येत नसल्याचे सांगण्यात आले.
पूर्वी किती कागद पुरवण्यात आला, त्याचा हिशेब द्यावा लागत नसे. आता प्रत्येक कागदाचा हिशेब द्यावा लागत असल्याने एखाद्या शाखेकडून या कामात दिरंगाई झाल्यास सगळ्यांचाच पुरवठा थांबवला जातो हे देखील एक कारण सांगण्यात येते. या पद्धतीने मुद्रांक शुल्क भरण्यात जास्त सुरक्षितता असते. ज्या व्यवहारासाठी शुल्क भरले आहे, तो व्यवहार कोणत्या उपनिबंधक कार्यालयात होणार त्यांच्याच नावे ईएसबीटीआर निघतो. दहा हजारांच्या वरील रकमेचे स्टॅम्प जास्त होतात, ते हाताळणे किचकट असते. एखादा स्टॅम्प गहाळ झाल्यास व्यवहार अपुरा ठरतो. हे सगळे धोके टाळता येत असल्याने लोक या पद्धतीने शुल्क भरण्याकडे प्राधान्य देतात. परंतु, हीच सेवा विस्कळीत झाल्याने लोकांची कुचंबणा होत आहे.
आम्ही स्टॅम्प रायटरचे काम करतो. अनेक पक्षकारांची कामे घेऊन बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जातो. काही व्यवहारांचे मुद्रांक शुल्कही बँकेकडे भरले आहे. परंतु, स्टॅम्प मिळायला तयार नाहीत. - माणिकलाल विभुते, शनिवार पेठ, कोल्हापूर.