पाॅकेटमनीतून त्या पाच जणी पुरवितात कोरोना रुग्णांसह नातेवाइकांना नाश्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:40+5:302021-05-13T04:23:40+5:30

सचिन भोसले लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘त्या’ पाचही जणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी त्यांच्यापैकी ...

Out of pocket money, the five provide breakfast to relatives, including corona patients | पाॅकेटमनीतून त्या पाच जणी पुरवितात कोरोना रुग्णांसह नातेवाइकांना नाश्ता

पाॅकेटमनीतून त्या पाच जणी पुरवितात कोरोना रुग्णांसह नातेवाइकांना नाश्ता

Next

सचिन भोसले

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘त्या’ पाचही जणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी त्यांच्यापैकी दोघी जणी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या. त्यावेळी त्यांनी कोरोना वाॅर्डातील रुग्णांसह कुटुंबीयांची होणारी धावपळ आणि पोटाचे होणारे हाल पाहिले. याबाबत इतर तिघींशी चर्चा करून रुग्णांसह कुटुंबीयांना नाश्ता देण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी दिलेल्या पाॅकेटमनीतून ‘त्या’ पाच जणींनी सोमवारपासून सीपीआर परिसरात रोज सकाळी नाश्ता तयार करून देण्यास सुरुवात केली. ही मदत तेथील रुग्णांसह नातेवाइकांना लाखमोलाची ठरत आहे.

कोल्हापुरातील श्रुती प्रमोद चौगुले, अर्पिता दत्तात्रय राऊत, श्रेया प्रमोद चौगुले, आचल विनोद कट्यारे व नेहा निवास पाटील या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्या दुधाळी हरिमंदिर परिसरातील समर्थ अपार्टमेंटमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी श्रुती चौगुले व अर्पिता राऊत या दोघींना घरच्यांनी सीपीआरमध्ये कोरोना लसीबाबत चौकशी करण्यासाठी पाठविले होते. उत्सुकतेपोटी दोघींनी कोरोना वाॅर्डातील रुग्णांसह कुटुंबीयांची होणारी धावपळ आणि पोटाचे होणारे हाल पाहिले. याबाबत मदत करण्याचा मनात निर्णय घेतला. त्यानुसार या दोघींनी श्रुतीची धाकटी बहीण श्रेया व तिची मैत्रीण आचल कट्यारे आणि नेहा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही आपण काय करू शकतो, याबद्दल चर्चा केली. चर्चेनंतर सकस नाश्ता देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल पालकांशी बोलणे केले. मात्र, त्यांनी कोरोना संसर्गामुळे जवळजवळ नकार दर्शविला. पाचही जणींनी मात्र आपला निर्णय काही बदलला नाही. आम्हाला पिझ्झा किंवा आइस्क्रीमसाठी पैसे देऊ नका. मात्र, या मदतीसाठी आर्थिक मदत करा, असे सांगितले. अखेरीस पालकांनी या सत्कार्यास मदत करण्यास होकार दिला. त्यानुसार सोमवारपासून या पाचही जणींनी सीपीआर परिसरात सकस नाश्ता देण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्या १०० लोकांना नाश्ता देत आहेत. सर्वच रुग्ण व नातेवाइकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. सध्याची त्यांची मदत येथील रुग्ण व नातेवाइकांना कमी पडत आहे. त्यात आणखी दानशूर व्यक्तींनी दातृत्व दाखविल्यास चांगल्या प्रकारे तेथे सकस नाश्ता व आहार पोहोचविता येईल.

-----------------------------

सर्वत्र कौतुक

श्रुती अहमदाबाद येथील युआयडीमधून डिझायनिंगमधील पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात आहे. अर्पिता ही विवेकानंद कॉलेजमध्ये बीबीए करीत आहे. श्रुतीची धाकटी बहीण श्रेया व तिची मैत्रीण आचल ही बारावीत आहे. नेहा ही काॅम्प्युटर सायन्स करते. कोरोनाच्या काळात नाती दुरावली जात असताना आपल्या आदर्श विचारांना कृतीत आणून समाजासमोर एक आदर्श ठेवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

-----------------------------

काेट

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामधील (सीपीआर) रुग्णांसह नातवाइकांचे होणारे हाल प्रत्यक्ष बघितल्यानंतर खारीचा वाटा म्हणून सकस नाश्ता देण्याचा निर्णय घेतला. जास्तीत जास्त तेथे आहार व नाश्ता पोहोचविणे गरजेचे आहे. त्याकरिता कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखविल्यास चांगला आहार व नाश्ता पोहोचविता येईल.

- श्रुती चौगुले, कोल्हापूर

-----------------------------

फोटो : १२कोल्हापूर ०२ व ०३

कोल्हापूर येथील पाच महाविद्यालयीन युवतींनी सीपीआरमधील कोरोना रुग्णांसह नातेवाइकांना रोज सकस नाश्ता पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Out of pocket money, the five provide breakfast to relatives, including corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.