कोल्हापुरात टोळीयुध्दाचा भडका; जवाहरनगरात गोळीबार, तरुण जखमी
By संदीप आडनाईक | Published: April 22, 2024 05:33 AM2024-04-22T05:33:51+5:302024-04-22T05:34:37+5:30
सात संशयितांचा शोध सुरु : धारदार शस्त्रांनी केले वार, मांडीत घातली गोळी
कोल्हापूर : जवाहरनगरात रविवारी रात्री टोळीयुध्दाचा भडका उडाला. सरनाईक वसाहतीमधील यादव काॅलनीतील शाद शौकत मुजावर (वय २३) याच्यावर सहा ते सात संशयितांनी पिस्टलमधून मांडीत गोळी घातल्याचा प्रकार रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. जखमीला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्या मांडीतील गोळी बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया सुरु आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अचानक घडलेल्या या टोळीयुध्दातील गोळीबारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजारामपुरी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. शाद हा चारचाकी गाड्या आणि जमीन खरेदी विक्री करतो. जवाहरनगर येथील सरनाईक वसाहतीमधील यादव कॉलनीतील शाद मुजावर रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर घराशेजारील कट्ट्यावर मित्रांसमवेत बोलत बसला होता. याचदरम्यान चारचाकी आणि दुचाकी वाहनावरुन सहा ते सातजण तेथे आले. त्यांनी अचानक शादच्या दिशेने पिस्टलमधून तीनवेळा गोळीबार केला, त्यातील एक गोळी शादच्या मांडीत घुसली तर दोन गोळ्या हवेत उडाल्या.
दरम्यान, याचवेळी दोघांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने शादच्या डोक्यावर हल्ला केला. त्याने हा हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केल्याने तो बचावला, पण शादच्या मांडीत गोळी घुसल्याने तो जखमी झाला. परिसरातील लोक तेथे येताना दिसताच सर्वांनी वाहनातून पळ काढला. जखमी शादच्या मित्रांनी तत्काळ दुचाकीवरुन त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरु आहे.