मतदार यादीतील चुकांविरोधात उद्रेक
By admin | Published: October 7, 2015 12:11 AM2015-10-07T00:11:59+5:302015-10-07T00:18:12+5:30
उमेदवारांकडून अधिकारी धारेवर : महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची शिवसेनेची मागणी
कोल्हापूर : प्रारूप मतदार याद्यांमधील चुकांबाबत मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्यानंतरही त्याची दखल न घेतल्याबद्दल मंगळवारी कोल्हापुरात राज्य निवडणूक आयोगाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. त्याचा फटका स्थानिक अधिकाऱ्यांना बसत असून, हे अधिकारी तोंडघशी पडले आहेत. मंगळवारी शिवसेनेसह काही आजी-माजी नगरसेवकांनी याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला. जर मतदारांना मतदानच करता येणार नसेल, तर निवडणूक एक महिना पुढे ढकला, अन्यथा आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशाराच यावेळी देण्यात आला.
माजी महापौर आणि शिवसेनेचे उमेदवार उदय साळोखे सायंकाळी पावणेसहा वाजता ताराबाई गार्डन येथील मुख्य निवडणूक कार्यालयात तावातावाने कार्यकर्त्यांना घेऊन गेले. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना आपल्या तटाकडील तालीम प्रभागातील सुमारे ५०० मतदारांची नावेच यादीत नसल्याचे सांगितले. प्रभागातील नागरिक असूनही त्यांची नावे यादीत नसतील तर ती कुठे गेली ते सांगा, अशी विचारणा केली. साळोखे अधिकाऱ्यांना जाब विचारत असतानाच तेथे शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, पूजा भोर, धनंजय सावंत, आदी पंचवीसहून अधिक शिवसैनिक कार्यालयात पोहोचले. त्यांनीही उपायुक्त ढेरे यांच्यावर आगपाखड सुरू केली. प्रभाग क्रमांक ३४ मधील मतदार प्रभाग क्रमांक २६ मध्येच राहिले आहेत. यासंदर्भात तक्रार देऊनही ती दुरुस्त झाली नाही, त्यामुळे मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार असल्याचे लिंग्रज म्हणाले.
प्रारूप मतदार यादीवर तक्रारी देऊनही त्या तशाच अंतिम मतदार यादीत राहिल्या असतील तर त्याला दोषी कोण, मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी कोणाची, जर दिलेल्या तक्रारी रास्त असूनही दुरुस्त होणार नसतील, तर निवडणूकच एक महिना पुढे ढकला, अन्यथा उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
नागाळा पार्क कार्यालयातही उमेदवाराचा गोंधळ
नागाळा पार्क हॉल क्षेत्रीय कार्यालयात मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एका इच्छुक उमेदवाराने चांगलाच गोंधळ घातला. आपले नाव नागाळा पार्क प्रभागात असताना ते शेजारील प्रभागात कसे गेले? हरकत घेतली असताना त्यावर कार्यवाही का झाली नाही? त्यामुळे मला निवडणुकीत उभारताना अडचण येत असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. त्यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्या समर्थकांनीही कार्यालयात गोंधळ घातला.
त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना, तुम्ही ज्या प्रभागात निवडणूक लढविणार असाल त्या प्रभागातील सूचक व अनुमोदन द्या, निवडणुकीत उभारण्यास काहीही अडचण येत नाही, असे सांगितले; पण संबंधित उमेदवार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी नाईलाजास्तव अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण करण्याचा
प्रयत्न केला. सुमारे दीड तास हा
गोंधळ सुरू होता. अखेर त्यांची महापालिका अधिकाऱ्यांनी समजूत काढली.
प्रारूप मतदार यादीत हरकत घेऊन देखील त्या चुका दुरुस्त न करता अंतिम मतदार यादीतून अनेक नावे गायब असल्याचे दाखवित माजी महापौर उदय साळोखे, शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज यांनी ताराबाई गार्डन क्षेत्रीय कार्यालयात मंगळवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गांधी मैदान कार्यालयातही गोंधळ
तिकडे गांधी मैदान क्षेत्रीय कार्यालयातही असाच गोंधळ उडाला. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नगरसेवक रविकिरण इंगवले, इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेवक प्रकाश मोहिते, रामदास भाले यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. के. माने यांना धारेवर धरत मतदार यादीतील घोळाबाबत जाब विचारला. सुमारे तासभर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. अंतिम मतदार यादीत गंभीर चुका राहिल्या असून, त्याला निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.
संभाजीनगर बसस्थानक प्रभागात भौगोलिकदृष्ट्या लांब असलेल्या टाकाळा, साईक्स एक्स्टेंशन, सानेगुरुजी वसाहत, साळोखेनगर प्रभागातील मतदारांची नावे आली आहेत. फिरंगाई प्रभागात मिरजकर तिकटी, देवणे गल्ली, खासबाग येथील सुमारे ८५४ मतदारांची नोंद झाल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. असेच प्रकार चंद्रेश्वर, नाथागोळे तालीम, पद्माराजे उद्यान, आदी प्रभागांतील मतदार यादीत घडले असल्याचे सांगण्यात आले. कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. काय उत्तर द्यायचे याच्या विचारात अधिकारी पडले. शेवटी येणाऱ्या तक्रारी घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
क्षेत्रीय निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे महसूल विभागाचे अधिकारी आहेत तर त्यांच्या जोडीला मनपाचे दोन अधिकारी देण्यात आले आहेत. जेव्हा तक्रार घेऊन नागरिक येतील तेव्हा मनपाच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत होते. चुका त्यांनी केल्या आहेत त्यांना भेटा, हे आमचे काम नाही, असे सांगून महसूलचे अधिकारी तक्रारी ऐकून घेण्याचेही टाळत होते.