‘सोयाबीन’वर खोडमाशी, चक्रीभुंगा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:17 AM2021-07-18T04:17:15+5:302021-07-18T04:17:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सोयाबीन पिकावर सध्या खोडमाशी, चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सोयाबीन पिकावर सध्या खोडमाशी, चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी जागरुक राहून त्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खोडमाशी लहान, चमकदार काळ्या रंगाची असून, तिची लांबी २ मिमी असते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, २-४ मिमी लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. नंतर पानाचे देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते, त्यामुळे रोप वाळते.
चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणत: एकमेकांपासून १ ते १.५ सेमी अंतरावर एकमेकाला समांतर दोन गोल काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते. त्यामुळे चक्री कापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ आणि फांदीतून आत जाते, मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव मूग, उडीद, चवळी या पिकावरसुध्दा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले.
ही करावी उपाययोजना -
पिवळे चिकट सापळे लावणे.
वाळलेली पाने, फांद्यांचा किडीसह नायनाट करावा.
इथियॉन ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के ६.७ मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा थायोमेथोक्झाम १२.६ लॅमब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी २.५० मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.