कोल्हापूर बंदला उस्फुर्त प्रतिसाद, व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांचा पाठींबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:26 PM2020-12-08T14:26:28+5:302020-12-08T14:28:11+5:30
Bharat Bandh, FarmarStrike, Kolhapurnews केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला.
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदलाकोल्हापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला.
शिवसेनेने शहरातून रॅली काढून केंद्राचा निषेध नोंदवला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात एकत्रीत येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वाभाडे काढले. ह्यस्वाभिमानीह्णने शिरोळमध्ये कृषी विधेयकांची होळी केली.
केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक अंमलात आणल्याने त्याविरोधात पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी देशातील राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. कोल्हापूरात त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामीण भागात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. मूरगूड येथे राधानगरी ते निपाणी राज्यमार्ग रोखून धरला. कोल्हापूर शहराततील व्यापाऱ्यांनीही पाठींबा दिला. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आदी बाजारपेठेत दुकाने दिवसभर बंद होती. औषध, पेट्रोलपंप वगळता इतर सगळे व्यवहार ठप्प होते. शहरातील रस्त्यांवर वर्दळ होती.
कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप, भाकप, शेकाप यासह वीस राजकीय पक्षांनी एकत्रीत केंद्र सरकारचा निषेध केला. बिंदू चौकात एकत्रित येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आसूड ओढले. ह्यस्वाभिमानीह्णचे नेते राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, शेतकरी एकदा अशांत झाला तर कोणालाही राज्यकारभार करता येणार नाही.
कोल्हापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे, गूळाचे सौदे बंद केले होते. त्याचबरोबर शहरातील प्रमुख पाडळकर मार्केट, कपिलतीर्थ, गंगावेश येथील भाजीमंडई ओस पडल्या होत्या. बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळे, गुळाची आवक न झाल्याने तिथे सुमारे साडे तीन कोटीची उलाढाल ठप्प झाली. दूधाचे संकलन सुरू असले तरी त्यावरही परिणाम झाला आहे. छोटीमोठी दुकाने बंद राहिल्याने कोट्यावधीची उलाढाल थांबली.