आदिवासी कोळी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 05:00 PM2020-01-16T17:00:23+5:302020-01-16T17:04:28+5:30
कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी समाज विकास मंडळाच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी समाज विकास मंडळाच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला.
‘हरहर महादेव, संवीधान आमच्या हक्काचे, एक कोळी-लाख कोळी’ अशा घोषणा देत आदिवासी महादेव कोळी, टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी मल्हार, डोंगर कोळी या समाजातील लहान मुलांसह महिला, युवती, पुरुष मोठ्या संख्येने न्यायमागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
बोगस आदिवासींच्या नावाखाली शासकिय नोकरीतील खऱ्या आदिवासी कर्मचाऱ्यांना पदमुक्त करण्यासाठी राज्य शासनाकडून सुरु असलेले षडयंत्र त्वरीत थांबवावे अशी मागणी या आक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आली.
मोर्चाला येथील टाऊन हॉल उद्यान परिसरातून प्रारंभ झाला. मोर्चा दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चातील सहभागी सर्व आंदोलकांच्या डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या, अनेकांच्या हाती भगवे झेंडे व मागण्यांचे तसेच निषेधांचे व इशारा देणारे फलक होते.
‘एक आदीवासी- लाख आदिवासी, एक कोळी-लाख कोळी, आम्ही मुळ निवासी भारताचे आम्ही आदीवासी, संवीधान आमच्या हक्काचे, हरहर महादेव’ अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर तेथे जाहिर सभेत रुपांतर झाले.