हॉटेलमधील सांडपाणी प्रक्रियेविना बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:23+5:302021-06-25T04:17:23+5:30
कळंबा : हॉटेल्स, मंगल कार्यालये, उपहारगृहे, जंकफूडच्या गाड्यांतून बाहेर फेकले जाणारे सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया केल्याखेरीज बाहेर टाकू नका, असे ...
कळंबा : हॉटेल्स, मंगल कार्यालये, उपहारगृहे, जंकफूडच्या गाड्यांतून बाहेर फेकले जाणारे सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया केल्याखेरीज बाहेर टाकू नका, असे स्पष्ट निर्देश हरित लवादाने देऊनही संबंधित घटक हेच नियम पायदळी तुडवित सांडपाणी थेट नाले, रस्त्यांवर टाकत असल्याने रंकाळा आणि कळंबा तलावाची अपरिमित हानी होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेनेचे हरित लवादाच्या या निर्देशांकडे कानाडोळा केल्याने हॉटेल्स, मंगल कार्यालये बिनदक्कतपणे सांडपाणी नाल्यांमध्ये सोडत असल्याचे चित्र आहे. उपनगरे आणि लगतच्या ग्रामीण भागात हॉटेल्स आणि ढाबा संस्कृतीने चांगलाच जोर धरला आहे. याशिवाय चौकाचौकात रस्त्याकडेस उभ्या जंकफूडच्या गाड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
हॉटेल, लॉज, उपाहारगृहे या ठिकाणी स्वयंपाकगृहे, धुणीभांडी यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. मात्र, यावर प्रक्रिया न करताच ते पाणी कोठेही, कसेही सोडले जाते. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. हे सांडपाणी उपनगरातील नैसर्गिक नाल्यांमधून थेट रंकाळा, कळंबा तलावात पोहचत आहे. त्यामुळे या दोन्ही तलावांत प्रदूषण वाढत असल्याचे चित्र आहे.
चौकट : हॉटेल, उपाहारगृहे, लॉज याठिकाणी पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी पुनर्प्रक्रिया करणारी यंत्रणा बसवावी लागते. रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे लागते. संबंधित प्रशासनाने दर तीन महिन्यांनी तपासणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. परंतु याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याचे प्रदूषणात भर पडत आहे.