वडणगेत मानेची पाटीलवर मात महाशिवरात्रीनिमित्त मैदान : १०० हून अधिक चटकदार कुस्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:20 AM2018-02-16T01:20:23+5:302018-02-16T01:22:26+5:30
वडणगे : येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात वडणगेचा मल्ल सचिन माने याने सचिन पाटीलचा एकेरी कस काढत पहिल्या क्रमांकाची कुस्ती जिंकली.
वडणगे : येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात वडणगेचा मल्ल सचिन माने याने सचिन पाटीलचा एकेरी कस काढत पहिल्या क्रमांकाची कुस्ती जिंकली. या स्पर्धेत पहिल्या तीनही क्रमांकाच्या लढती वडणगेतील मल्लांनी जिंकल्या. मैदानात लहानमोठ्या १००हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले होते. ग्रामपंचायत पटांगणावर झालेल्या या मैदानाचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, एस. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सूरज पाटील, पंचायत समितीचे सदस्य इंद्रजित पाटील, बाळासाहेब पाटील, वाय. के. चौगले, वडणगे सेवा संस्थेचे सभापती पिराजी मेथे, उपसभापती आनंदराव पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे पदाधिकारी, झुआरी केमिकल्स आणि एस. एम. घाटगे सन्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पहिल्या क्रमांकाची लढत वडणगेचा मल्ल सचिन माने व पारगावच्या सचिन पाटील यांच्यात झाली. दहा मिनिटे चाललेल्या या लढतीत सचिन माने याने एकेरी कस काढत सचिन पाटील याला चितपट केले. दुसºया क्रमांकाच्या लढतीत वडणगेच्या युवराज माने याने अविनाश माने याला घुटना डावावर अस्मान दाखवले. हृषीकेश माने याने गणेश पाटील याला पराभूत करून तिसºया क्रमांकाची लढत जिंकली. अन्य लढतीत अनिल नंदीवाले, बजरंग गायकवाड, दिलीप साळोखे यांनी प्रतिस्पर्धी मल्लांवर विजय मिळवले. मैदानात लहानमोठ्या १०० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.
कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. विजेता सचिन माने याला पाच हजार रुपये, दुसºया क्रमांकाचा विजेता मल्ल युवराज माने याला तीन हजार रुपये तसेच इतर विजेत्या मल्लांना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली. सुकुमार माळी यांच्या निवेदनामुळे मैदानाला चांगलीच रंगत आली होती. पंच म्हणून तुकारात चोपडे, बाळासो पाटील, अशोक पाटील, प्रकाश पाटील (वारणा), अर्जुन चौगले, विश्वास जाधव यांनी काम पाहिले.
वडणगे (ता. करवीर) येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती लढतीतील एक क्षण. तर दुसºया छायाचित्रात विजेता मल्ल सचिन माने याला बी. एच. पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी सरपंच सचिन चौगले, बाळासो काटे, दीपक व्हरगे, बाजीराव पाटील, जीतू सावंत व मान्यवर उपस्थित होते.