एकाच दिवसात दोन लाखांवर भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन!
By सचिन भोसले | Published: August 13, 2023 07:29 PM2023-08-13T19:29:37+5:302023-08-13T19:34:05+5:30
पन्हाळा, जोतिबा डोंगरावरदेखील पर्यटक व भाविक दर्शनासाठी गर्दी उसळली होती.
कोल्हापूर : शनिवारपासून सलग चार पाच सुट्या लागल्यामुळे कोल्हापूर शहर पर्यटकांनी अक्षरशः फुलले आहे. गेल्या दोन दिवसांत दोन लाख भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. ऐन पावसाळ्यातही मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची तसेच हॉटेल व्यावसायिकांची मोठी उलाढाल झाली. पन्हाळा, जोतिबा डोंगरावरदेखील पर्यटक व भाविक दर्शनासाठी गर्दी उसळली होती.
ऑगस्ट महिन्यातील दुसरा शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यदिन व बुधवारी पारशी नूतन वर्ष अशा सुटींची पर्वणी मिळाली आहे. त्यामुळे साहजिकच नागरिक दोन, तीन दिवसांच्या सहलीसाठी बाहेर पडले आहेत. कोल्हापुरात रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून बिंदू चौक, दसरा चौक, भाऊसिंगजी रोड, मिरजकर तिकटी, आईसाहेब महाराज पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक आदी रस्ते वाहनांनी भरून गेले. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत होती. ती सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
रविवारी दिवसभर भाविकांनी सरलष्कर भवनासमोरील दरवाजातून अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. दिवसभर रांग लागल्याचे चित्र होते. विद्यापीठ हायस्कूल दरवाजासमोरील बाजूस मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भाविकांना ऊन-पावसाचा सामना करीत रांगेत उभे राहावे लागलें. अनेक भाविकांनी कायमस्वरूपी दर्शन मंडपाची सोय करावी, अशीही मागणी करीत संताप व्यक्त केला. अधिक मासाची सांगता होणार असल्याने राज्यासह परराज्यातील भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवारी ९० हजारांहून अधिक, तर रविवारी लाख असे दोन लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर अनेक भाविकांनी न्यू पॅलेस, रंकाळा तलाव, कणेरी मठ, किल्ले पन्हाळगड, जोतिबा आदी ठिकाणांना भेट देण्यास प्राधान्य दिले.
यात्री निवास फुल्ल
सलग पाच दिवसांची सुटी मिळाल्याने कोल्हापुरातील यात्री निवास, हॉटेल्स, महालक्ष्मी धर्मशाळाचे आरक्षण फुल्ल झाले आहे. पाच दिवसांनी पुढचे आरक्षण मिळेल असे चौकशी केल्यानंतर हॉटेल चालकांकडून सांगितले जात आहे. याशिवाय शासकीय विश्रामगृह, विविध खात्यांची विश्रामगृहे ही आरक्षित झाली आहेत. याशिवाय शहराबाहेरील हॉटेल्सही फुल्ल झाली आहेत.
वाहतूक पोलिस अखंड कार्यरत
सलग सुट्यांमुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिवसभर हे कर्मचारी ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होईल तेथे पोहचून सुरळीत करीत होते. याशिवाय नो पार्किंगमधील दुचाकीवर क्रेनद्वारे, तर चारचाकीस जामर लावून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.