प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ‘प्रकाश’ बनले सी.ए.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:52 AM2019-08-22T00:52:14+5:302019-08-22T00:52:17+5:30
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिद्द आणि कष्टाची तयारी असेल, तर अशक्यही शक्य करून दाखविण्याची किमया ...
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिद्द आणि कष्टाची तयारी असेल, तर अशक्यही शक्य करून दाखविण्याची किमया वडणगे (ता. करवीर) येथील प्रकाश शंकर कवडे यांनी करून दाखविली. विविध अडचणी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत तब्बल सात वर्षांच्या प्रयत्नांनंतर चार्टर्ड अकौंटंट पदाच्या (सीए) परीक्षेत त्यांनी बाजी मारली.
कवडे कुटुंबीय मूळचे बानगे
(ता. कागल) येथील आहे. शंकर कवडे हे नोकरीनिमित्त कोल्हापुरात आले. एका कापड दुकानात ते काम करू लागले. संसाराला हातभार म्हणून प्रकाश यांच्या आई चंद्रकला या शिलाईकाम करत होत्या.
प्रकाश यांना डी. एड. करायचे होते. मात्र, बारावीला ५८ टक्के गुण असल्याने त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे प्रकाश यांनी शहाजी महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च स्वत: करण्याच्या उद्देशाने त्यांनी शासकीय ठेकेदार विजयकुमार भिके यांच्याकडे लेखनिक म्हणून काम सुरू केले. त्या ठिकाणी त्यांना सी. ए. अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. गणिताची आवड असल्याने त्यांनी सी. ए. होण्याचे ठरविले. त्यावर शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या हा सीए अभ्यासक्रम झेपणारा नाही. एमबीए करून अथवा अकौंटंट म्हणून काम करण्याचा सल्ला काहींनी दिला; पण कुटुंबीयांच्या पाठबळाच्या जोरावर प्रकाश यांनी ‘सीए’ ची तयारी सुरू केली. पहिला टप्पा असणाऱ्या ‘सीपीटी’ला त्यांनी नोंदणी केली. अकौंटंट म्हणून काम करीत अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात सीपीटी उत्तीर्ण झाले. इंटरमीजिएटची तयारी करताना इंग्रजीची अडचण आली. त्यावर खासगी शिकवणी लावली. इंटरमीजिएट आणि आर्टिकलशिप करून सी.ए.च्या अंतिम परीक्षेत चांगल्या गुणांची कमाई करीत बाजी मारली. त्यांना आई-वडील, पत्नी वर्षाराणी, बहिणी अरुणा बारडे, गीता तावडे, विजयकुमार भिके, विजय जाधव, सुमित बिरंजे, आशिष भोसले, राघवेंद्र बकरे, नीलेश परीट यांची मदत झाली.
कधी गॅरेज, तर कधी सेंट्रिंग काम
दहावीनंतर कधी गॅरेज, कापड दुकानात, तर कधी सेंट्रिंग काम, आॅफिसबॉय, तर कधी अकॅडमी, खासगी कार्यालयात अकौंटंट म्हणून काम करीत प्रकाश यांनी शिक्षण पूर्ण केले. अजूनही ते वडणगे येथे भाडेतत्त्वावरील घरात राहतात. दोन वर्षे प्रॅक्टिस करून पुढे स्वत:ची फर्म सुरू करण्याचे त्यांचे ध्येय आहे.