अंधत्वावर मात करुन विक्रीकर पदाला गवसणी
By admin | Published: March 18, 2017 10:31 PM2017-03-18T22:31:39+5:302017-03-18T22:31:39+5:30
समाजात प्रकाश : गजानन दीक्षित यांचे यश
पसरणी : मूळचे पसरणी, ता. वाई येथील व सध्या वाईमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि अंध असणाऱ्या गजानन दीक्षित यांनी ‘जिद्द चिकाटी’च्या जोरावर अंधत्वावर मात केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक व कर सहायक या दोन्ही परीक्षेत अंध विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रात पहिला व संपूर्ण परीक्षार्थींमध्ये २० वा क्रमांक त्यांनी मिळवल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गजानन दीक्षित यांचे वडील वाईच्या किसन वीर महाविद्यालयात शिपाई पदावर काम करत होते. गावी शेती नसल्याने एकट्याच्या जीवावर घरची परिस्थिती होती. आई गृहिणीचे काम करत असे.
परंतु गजाननला खूप शिकायचे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पसरणी येथे झाले व उच्च शिक्षणासाठी किसन वीर महाविद्यालय गाठले. परंतु न डगमगता संघर्ष सुरू ठेवला. पुढे बी. एड, डी. एड. पूर्ण करून एलएलबीसाठी प्रवेश घेतला. हे करत असताना वाई पंचायत समितीमध्ये २००६ पासून फिरते विषय शिक्षक पदावर कंत्राटी स्वरूपात कार्यरत राहिले.
‘सातारा जिल्ह्याची आर्थिक व सामाजिक स्थिती’ या विषयावर पीएच.डी चे त्यांचे संशोधन सुरू आहे. पत्नी पूनम दीक्षित व परिवर्तन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक संग्राम पिसाळ यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले.
विक्रीकर निरीक्षक व कर सहायक या दोन्ही परीक्षेत महाराष्ट्रामध्ये अंध विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक व सर्व विद्यार्थ्यांमध्ये २० वा क्रमांक मिळाल्याने त्यांची शिक्षणाविषयीची आवड व जिद्द चिकाटीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. (वार्ताहर)
मोबाईल रेकॉडिंगचा आधार
गजानन दीक्षित यांना डोळ्यांनी दिसत नसल्याने त्यांचे मित्र संग्राम पिसाळ व पत्नी अभ्यासक्रम मोठमोठ्याने वाचून दाखवत व मोबाईलमध्ये त्याचे रेकॉर्डिंग करत. दीक्षित ते पुन्हा-पुन्हा ऐकत व अभ्यास करत. शिक्षणाविषयीचे प्रेम त्यांची जिद्द यांनी अंधत्वावर मात करत शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केले आहे.