Kolhapur: कॅन्सरचे उपचार घेत जिंकली दहावीची लढाई, वरणगे पाडळीच्या रवींद्र कांबळेच्या जिद्दीची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 01:52 PM2024-05-28T13:52:38+5:302024-05-28T13:53:52+5:30
सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचा मानस
प्रयाग चिखली : ब्लड कॅन्सरवर मात करत वरणगे पाडळीतील भैरवनाथ हायस्कूलचा विद्यार्थी चेतन रवींद्र कांबळे याने जिद्दीने ७१.८० टक्के गुण मिळवत दहावीची लढाई जिंकली.
मूळचे पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील रवींद्र ज्ञानदेव कांबळे यांचे कुटुंब वरणगे पाडळी येथे वास्तव्यास आहे. घरचे अठरा विसवे दारिद्र्य असल्यामुळे ते पत्नी सुवर्णा, मुलगा चेतन आणि मुलगी प्रतीक्षा यांच्यासह वरगणेतील रणजीत नलगे यांच्या शेतावर चार वर्षांपूर्वी शेतमजूर म्हणून काम करण्यासाठी आले. त्यातच मुलगा चेतन याला इयत्ता आठवीमध्ये ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि कांबळे कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले. एक वर्ष मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रेडिएशन व कॅन्सरचे उपचार घेतले. सध्या रेडिएशनची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत.
नववीचे पूर्ण वर्ष केमोथेरपीमध्ये गेले. दहावीमध्ये या सगळ्यावर मात करत केवळ सात महिने चेतनला शाळेत जाता आले. आईवडील शेतमजूर, घरची परिस्थिती बिकट, त्यातच ब्लड कॅन्सरसारखा दुर्धर आजार या सर्वांवर मात करत चेतनने मिळवलेले यश प्रेरणादायी असेच आहे. चेतनला शिक्षक जगन्नाथ परीट, विष्णू यादव, अनिल सपकाळे, मुख्याध्यापक ए.जी. पाटील यांच्याबरोबरच मामा संदीप माळवी, सुनील माळवी तसेच आई सुवर्णा, वडील रवींद्र व लहान बहीण प्रतीक्षा यांचे पाठबळ लाभले. भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे चेतनचे ध्येय आहे.