संकटांवर मात करीत अखेर ‘आयईएस’ बनला

By admin | Published: September 17, 2014 11:23 PM2014-09-17T23:23:40+5:302014-09-17T23:42:59+5:30

इच्छाशक्ती अन् जिद्दीने घडविले : भविष्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार

Overcoming the pitfalls, finally became 'IES' | संकटांवर मात करीत अखेर ‘आयईएस’ बनला

संकटांवर मात करीत अखेर ‘आयईएस’ बनला

Next

शिवाजी सावंत - गारगोटी -‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या काव्यपंक्तीची यथार्थता पटते ती टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील सुनील आसबे याने ‘आयइएस’ परीक्षेत देशात ७८वा येऊन पात्रता सिद्ध केलेली पाहिली की, एकदा मनाने आत्मविश्वासपूर्वक ध्येय ठरवले की, तेथे परिस्थितीची कुबडी निखळून पडते, हे प्रत्ययास येते.
भुदरगड तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या टिक्केवाडी या खेडेगावातील मधुकर आसबे हे गरीब शेतकरी. त्यांना एक मुलगा व दोन मुली. थोरला मुलगा सुनील या निसर्गधर्माप्रमाणे वाढत होता. तो इतर मुलांबरोबर गावातील प्राथमिक शाळेत जाऊ लागला. लहानपणी शाळेत एक ‘एमपीएससी’चे अधिकारी आले असता त्यांनी शाळेत मुलांना प्रश्नपत्रिकेविषयी सांगितले. सुनीलने ते प्रश्न तातडीने सोडविले, तेव्हा त्याच्या मनात अधिकारी होण्याचे ‘बीज’ रोवले गेले. सुनील पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आला. त्याला अधिकारी व्हायचे होते. मात्र, मधुकर आसबे यांना आर्थिक स्थितीबाबत काय करायचे, हा प्रश्न पडला. व्यवसाय करावा तर भांडवल नव्हते, म्हणून त्यांनी ‘एलआयसी’चा एजंट म्हणून बिनभांडवली व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात जम बसवत असतानाच सुनीलचे प्राथमिक शिक्षण संपत आले होते. विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेत सुनील अव्वल येऊन नाव कमवित होता. त्यामुळे वडिलांचाही हुरूप वाढत होता. त्याने माध्यमिक शिक्षणासाठी गारगोटी येथील शाहू कुमार भवनमध्ये प्रवेश घेतला. तेथे विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केल्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. गुणानुक्रमाने तेथे आलेले प्रतिनिधिपद नाकारले, तर शेवटच्या वर्षी ते स्वीकारले. पहिल्या वर्षापासून वर्गात पहिला येण्याचा मान त्याने हुकू दिला नाही. शेवटच्या वर्षी १० ग्रेडपैकी ९.९ ग्रेड मिळवून अभियांत्रिकी विश्वात एक वेगळा विक्रम केला.
ध्येयवेड्या सुनीलने ‘यूपीएससी’मध्ये इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसची निवड केली. तिथेही पहिल्यांदा यश मिळाले. मात्र, त्यामधून डॉ. होमी भाभा अणुशक्ती केंद्रात मिळालेली संशोधकाची नोकरी स्वीकारली नाही. नंतर ‘एमपीएससी’मधून मिळालेली जलसंपदा विभागातील इंजिनिअरची निवडही नाकारली. ‘यूपीएससी’च्या परीक्षेत तो दोनवेळा अपात्र ठरला. मात्र, अपयशाने न खचता त्याचा अभ्यास व प्रयत्न सुरूच होते. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याची ‘आयईएस आॅर्डनन्स फॅक्टरी बोर्ड डिपार्टमेंट आॅफ डिफेन्स प्रॉडक्शन, संरक्षण मंत्रालय’ येथे निवड झाली. या परीक्षेत एकूण १५४ विद्यार्थी पास झाले. त्यामध्ये तो ७८ वा, तर महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांत तो तिसरा आहे.

घरच्या गरिबीवर मात करीत जिद्द, चिकाटी, सातत्य, तसेच आई-वडील, शिक्षक नामदेव गुरव, एन. डी. पाटील, जी. के. पाटील, बाळकाका देसाई व माजी आमदार बजरंग देसाई यांचे मार्गदर्शन घडले. भविष्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार, कारण मला इथवर पोहोचताना मार्गदर्शक नव्हता. त्यामुळे मी चाचपडत गेलो; पण तालुक्यातील भावी पिढीसाठी मार्गदर्शन करून समाजाचे ऋण फेडणार आहे.
- सुनील आसबे

Web Title: Overcoming the pitfalls, finally became 'IES'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.