कॉँग्रेसअंतर्गत वर्चस्ववाद उफाळला
By admin | Published: April 26, 2016 12:12 AM2016-04-26T00:12:32+5:302016-04-26T00:38:15+5:30
पीएन-सतेज यांच्यातच कुस्ती : जिल्हाध्यक्षपदासाठी नव्हे जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी रस्सीखेच
विश्वास पाटील -- कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसमधला वाद हा वरकरणी जिल्हाध्यक्षपदाचा दिसत असला तरी तो खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत सत्ता कुणाची; यासाठी सुरू असलेला आमदार सतेज पाटील व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यातील राजकीय वर्चस्वासाठीचा तो संघर्ष आहे. विधान परिषदेला ‘सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक’ असा सामना झाला व तो सतेज यांनी जिंकला. आता ‘सतेज विरुद्ध पी. एन.’ अशी कुस्ती पुन्हा होत आहे.
विधान परिषदेला ‘महादेवराव महाडिक सतेज यांना सोडून कुणालाही उमेदवारी द्या,’ असे म्हणत होते. आता पी. एन. तोच फॉर्म्युला वापरून ‘प्रकाश आवाडे सोडून कुणालाही (म्हणजे अर्थातच मी सांगेन त्याला) अध्यक्षपद द्या,’ असे म्हणत आहेत. या वर्चस्वाच्या राजकारणात काँग्रेसमध्ये दुफळी झाली आहे. काँग्रेस नेस्तनाबूत झाली तरी नेत्यांना त्याच्याशी काही सोयरसूतक नाही फक्त ‘सूर्य माझ्या कोंबड्याच्या आरवण्यानेच उगवला पाहिजे,’ यासाठी हा सगळा खटाटोप आहे.
पी. एन. पाटील यांच्या राजकीय वाटचालीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद हा मोठा आधार ठरला आहे. आजही गोकुळवगळता त्यांच्याकडे तसे कोणतेही सत्तेचे पद नसताना जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचा दबदबा कायम राहण्यामागे हे पदच कारणीभूत आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून प्रशासनातील कामे करून घेण्यास उपयोग होतो व इतर सार्वजनिक जीवनातही मान-सन्मान मिळतो. जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे या पदामुळे कमी-अधिक प्रमाणात हातात ठेवता येतात. त्यामुळे हे तसे त्रासाचे पद आहे, असे सगळे म्हणत असले तरी ते प्रत्येकालाच हवे असते. डिसेंबरपासून जिल्हा परिषदेच्या घडामोडी सुरू होत आहेत. तिथे उमेदवारी देण्यापासून पुढची सगळी रणनीती ही जिल्हाध्यक्ष हेच ठरवितात.
गत निवडणुकीत सतेज पाटील यांच्या जास्त जागा आल्यावर त्यांनी दिवंगत नेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी आघाडी करून सत्ता आपल्या हातात ठेवली. आता काँग्रेसमधून महाडिक गट हद्दपारच झाला आहे. त्यामुळे एकदा जिल्हाध्यक्षपदही सतेज पाटील यांच्याकडे गेल्यास त्यांना रोखणे शक्य नाही शिवाय ते जिल्ह्याच्या राजकारणाचे सर्वेसर्वा होऊ शकतात. त्यांना त्यापासून रोखण्याची ही पहिली पायरी आहे. त्यामुळेच पी. एन. यांनी ताकद एकवटली आहे.
प्रकरण सोनिया गांधींपर्यंत
मागे एकदा पुणे येथे झालेल्या बैठकीवेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पी. एन. यांना तुम्ही इतकी वर्षे जिल्हाध्यक्ष कसे, अशी विचारणा केली होती. तो आधार घेऊन हा विषय राहुल गांधी व पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत नेण्याचा आवाडे गटाचा प्रयत्न आहे.
काँग्रेसचे चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या माध्यमातून त्यासाठीचे लॉबिंग सुरू आहे.
पी. एन. आक्रमक
मी पक्षाकडे कधीच मला जिल्हाध्यक्षपद द्या, असे मागायला गेलो नव्हतो शिवाय या जबाबदारीतून मला मुक्त करा, असे मी स्वत:च प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सांगितले असल्याचे पी. एन. पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुम्ही जिल्हाध्यक्ष बदलणार असाल तर तो खुशाल बदला परंतु हे पद ‘प्रकाश आवाडे यांना देता कामा नये, अन्यथा काँग्रेस खिळखिळी होईल,’ असा दमच त्यांनी चव्हाण यांना दिला आहे. त्यामुळे त्यांचीही कोंडी झाली आहे.
हिंदुराव चौगले यांना संधी..
पी. एन. यांना हे पद दिले गेले नाही तर ते या पदासाठी हिंदुराव चौगले यांचे नाव पुढे करु शकतात. चौगले हे पी. एन. यांचे ‘निष्ठावंत’ आहेत. शिवाय राधानगरी तालुक्याला संधी दिली, असेही समर्थन करता येते.
एक-दोन दिवसांत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा पी. एन व आवाडे यांच्यातच जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच झाली तेव्हा संजयबाबा घाटगे यांना ही संधी दिली गेली परंतु ते नामधारीच राहिले. आताही पी. एन. गटाचा म्हणून जो कुणी अध्यक्ष असेल तो नामधारीच असेल. सूत्रे खऱ्या अर्थाने पी. एन. यांच्याकडेच राहतील.