बैलाने लाकूड ओढण्याची शर्यत रद्द

By Admin | Published: June 9, 2017 12:20 AM2017-06-09T00:20:24+5:302017-06-09T00:20:24+5:30

बैलाने लाकूड ओढण्याची शर्यत रद्द

The ox shall run the wood | बैलाने लाकूड ओढण्याची शर्यत रद्द

बैलाने लाकूड ओढण्याची शर्यत रद्द

googlenewsNext


राजाराम पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : बेंदूर सणाच्या निमित्ताने येथे बैलाने लाकूड ओढण्याच्या स्पर्धेची प्रथा आहे. सणाच्या निमित्ताने गुरुवारी घेण्यात येणाऱ्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून शर्यतीसाठी लागणारे लाकूड जप्त केले. परिणामी, या शर्यतीच्या शौकिनांमध्ये खळबळ उडाली आहे. शर्यत बेकायदा असल्याने या घटनेपासून लोकप्रतिनिधी व स्थानिक नेत्यांनी लांब राहणेच पसंद केले.
शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे. बेंदूर सणाच्या निमित्ताने बैलाने लाकूड ओढण्याची शर्यत आणि विविध प्रकारच्या जनावरांचे प्रदर्शन भरविले जाते. लाकूड ओढण्याची शर्यत सणाच्यापूर्वी एक-दोन दिवस व प्रदर्शन सणादिवशीच घेतले जाते.
बैलाने लाकूड ओढण्याच्या शर्यतीसाठी शहराबरोबर आसपासच्या खेडेगावांतूनही बैल आणले जातात. बैलगाडी, घोडागाडी, बैलाने लाकूड ओढण्याच्या शर्यती या बेकायदेशीर ठरवून सरकारने त्या रद्दबातल ठरविल्या आहेत. तरीही लाकूड ओढण्याच्या शर्यती बेंदूर, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी अशावेळी भरविल्या जातात. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी सहा वाजता येथील जिम्नॅशियम मैदानावर शर्यत आयोजित केली होती.
बैलांच्या बीन दाती, दोन दाती व खुल्या गटांत होणाऱ्या या शर्यतींमध्ये २६ बैलांनी सहभाग नोंदविला. शर्यतीमध्ये सहभागी झालेले बैल व त्यांच्या मालकांसह समर्थकांची सकाळी नऊ वाजल्यापासूनच मैदानावर लगबग सुरू होती, तर शर्यती पाहण्यासाठी सुमारे सात ते आठ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. सुरुवातीला दोन ते तीन बैलांना लाकडाला जुंपून त्यांची शर्यत पार पडली. क्रमांकानुसार प्रवीण मगदूम यांचा बैल जुंपण्यासाठी मैदानावरील फज्जावर आणला असता त्याच्या खांद्यावर जू ठेवून बांधत असताना बैल अचानकपणे पुढे गेला. पंचांनी इशारा करण्यापूर्वीच बैल पुढे गेल्यामुळे शर्यतीतून बैल बाद ठरविण्याचा निर्णय पंचांनी जाहीर केला. याच मुद्द्यावरून मगदूम समर्थकांनी वाद घातला. नाही तर शर्यतीच रद्द करा, अशी मागणी केली. संयोजक आणि मगदूम समर्थक यांच्यातील वाद बराच वेळ चालल्यानंतर मैदानाजवळच असलेल्या एका वाचनालयाच्या इमारतीत शर्यतीतील बैलांचे मालक व संयोजक यांची बैठक झाली. बैठकीमध्ये बैलाला आणखीन एक संधी देण्याचे ठरले.
त्याप्रमाणे मैदानावर येऊन पुन्हा शर्यत सुरू करण्यात आली. मात्र, या बाबीचा सुगावा पोलिसांना लागला होता. दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीवर असलेल्या मैदानामुळे शिवाजीनगर व गावभाग या पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी बैलांची शर्यत बेकायदा असल्याचे सुनावले आणि शर्यतीसाठीची लाकडे जप्त केली.
हुल्लडबाजीत वाढ
शर्यतीमधील लोकप्रियता आणि थरार पाहता काही शौकीन तरुणांच्या गटाने बैल पाळण्यास सुरुवात केली आहे. वर्गणी काढून त्या बैलावर खर्च केला जातो आणि असा बैल शर्यतीमध्ये पळविला जातो. शर्यतीदरम्यान काही वाद झाला तर संबंधित तरुणाच्या गटाकडून हुल्लडबाजी करण्याच्या संख्येत मात्र वाढ होऊ लागली आहे.
अंधश्रद्धेवर अधिक भर
बैलाला दृष्ट लागू नये म्हणून काळ्या घोंगड्याने त्याला झाकले जाते. याशिवाय शर्यतीमध्ये त्याचा पहिला क्रमांक लागावा म्हणून मंतरलेला लिंबू-दोरा, हळदी-कुंकू अशा तऱ्हेचे प्रकार केले जातात. अगदी मैदानामध्ये येणाऱ्या बैलाने कोणत्या दिशेने मैदानात प्रवेश करावा, हेसुद्धा एखाद्या ज्योतिषाला विचारून ठरविले जाते. .
जहागीर कालावधीपासून शर्यतीची प्रथा
बैलाने लाकूड ओढण्याच्या शर्यतीची प्रथा कर्नाटक राज्यातील सीमाभागात आहे. तेथून इचलकरंजीला ही प्रथा सुरू झाली. त्याला शंभर वर्षे उलटल्याचे सांगण्यात येते. कर्नाटकी बेंदरानिमित्त होणाऱ्या या शर्यतीबरोबर तत्कालीन जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी जनावरांची प्रदर्शने भरवून त्यांना बक्षिसे देण्याची प्रथा सुरू केली.

Web Title: The ox shall run the wood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.