निपाणीतून ५ तालुक्यांना ‘ऑक्सिजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:48+5:302021-05-10T04:24:48+5:30
निपाणी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निपाणीनजीकच्या श्रीपेवाडी औद्योगिक वसाहतीत असलेल्या ऑक्सिजन प्लांटमधून निपाणी, चिकोडी, अथणी, रायबाग, कागवाड आदी ...
निपाणी :
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निपाणीनजीकच्या श्रीपेवाडी औद्योगिक वसाहतीत असलेल्या ऑक्सिजन प्लांटमधून निपाणी, चिकोडी, अथणी, रायबाग, कागवाड आदी तालुक्यांना ऑक्सिजन पुरवठा होत आहे. यामुळे हा ऑक्सिजन प्लांट अतिशय महत्त्वाचा असून येथून कोणत्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवायचा, यावर प्रशासनाने नियोजन केले आहे. प्रांताधिकारी युकेशकुमार व निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या देखरेखीखाली ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे.
ऑक्सिजन प्लांटच्या बाहेर २४ तास अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांच्या देखरेखीखालीच ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे. येथून दिवसाला सुमारे 350 ऑक्सिजन सिलिंडर निर्माण होतात. यावर निपाणीसह अन्य ४ तालुके अवलंबून असल्याने सर्व तालुक्यांना ऑक्सिजन पुरवणे ही प्राथमिकता आहे. त्यामुळे या ५ तालुक्यांना ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. कोविड केअर सेंटर ज्या रुग्णालयात सुरू आहे व २७ एप्रिलपूर्वी ज्यांना परवानगी मिळाली आहे त्यांनाच येथून ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. सध्या निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालय, डॉक्टर देशपांडे रुग्णालय, जीव आयसीयू रुग्णालय, डॉक्टर निर्मळे रुग्णालय, दानेश्वरी रुग्णालय, महालक्ष्मी हॉस्पिटल व जोल्ले कोरोना केअर सेंटर याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू आहेत. याच रुग्णालयांना ऑक्सिसन पुरवला जाणार आहे.
प्रांताधिकारी व तहसीलदार यांची मध्यरात्री भेट
निपाणी तालुक्यात असलेल्या एकमेव ऑक्सिजन प्लांटला शनिवारी मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांनी -प्रांताधिकारी युकेशकुमार व तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी भेट दिली व ऑक्सिजन प्लांटमधून ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती घेतली.
प्रत्येक रुग्णालयाला २४ तासांत मिळणारा ऑक्सिजन
कोविड सेंटर
मिळणारे ऑक्सिजन सिलिंडर
देशपांडे रुग्णालय
15
जोल्ले कोविड रुग्णालय
20
दानेश्वरी हॉस्पिटल
15
म. गांधी रुग्णालय
25
जीव आय सी यू
15
महालक्ष्मी हॉस्पिटल
10
निर्मळे हॉस्पिटल
15
फोटो
निपाणी : ऑक्सिजन प्लांटला मध्यरात्री भेट देऊन प्रांताधिकारी युकेशकुमार व तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सर्व माहिती घेतली.