रुग्णाला ऑक्सिजनचा आधार लाखमोलाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:19+5:302021-08-23T04:27:19+5:30
संकेश्वर : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा आधार लाखमोलाचा आहे. कत्ती ट्रस्टने सुरू केलेला ऑक्सिजन प्रकल्प सीमाभागातील रुग्णांना लाभदायी ...
संकेश्वर :
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा आधार लाखमोलाचा आहे. कत्ती ट्रस्टने सुरू केलेला ऑक्सिजन प्रकल्प सीमाभागातील रुग्णांना लाभदायी ठरेल, असे मत निडसोशी मठाधिपती पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केले. चिकालगुड (ता. हुक्केरी) येथे कै. राजेश्वरी कत्ती चॅरिटेबल ट्रस्ट व बीडीसी बँक यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्लॅन्टची विधिवत पूजा पृथ्वी कत्ती यांच्याहस्ते करण्यात आली.
३० गुंठ्यामध्ये अडीच कोटी रूपये खर्चून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत हवेतील ऑक्सिजन शोषून व लिक्विडवर आधारित ४ युनिट उभारण्यात आले आहेत. प्रतिदिवस ५३० सिलिंडर क्षमता आहे. या प्रकल्पातून तालुक्यातील हिराशुगर, विश्वनाथ, संगम कारखान्यास कराराने ३० वर्षे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.
सरकारी व खासगी दवाखान्यास ना नफा..ना तोटा.. या तत्त्वावर सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे. निखिल कत्ती यांनी स्वागत केले. पवन कत्ती यांनी आभार मानले.
फोटो ओळी : चिकालगुड (ता. हुक्केरी) येथे ऑक्सिजन प्लॅन्टच्या उद्घाटनप्रसंगी शिवलिंगेश्वर महास्वामीजी, पृथ्वी कत्ती, पवन कत्ती, निखिल कत्ती आदी उपस्थित होते.
क्रमांक : २२०८२०२१-गड-१०