गारगोटी, राधानगरीत ऑक्सिजन जनरेशन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:41+5:302021-05-22T04:22:41+5:30
गारगोटी : कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून आमदार प्रकाश आबिटकर यांनी गारगोटी ग्रामीण रुग्णालय आणि राधानगरी येथे ...
गारगोटी : कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून आमदार प्रकाश आबिटकर यांनी गारगोटी ग्रामीण रुग्णालय आणि राधानगरी येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी ५० लाखांचा निधी आपल्या फंडातून मंजूर केला असून आजरा तालुक्यासाठी १० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करुन दिले आहेत.
राधानगरी विधानसभा मतदार संघातील राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी धावाधाव करावी लागते. परंतु कोरोना रुग्णांची होणारी वाढ यामुळे ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्णांची फार मोठी गैरसोय होत आहे. याकरिता ग्रामीण भागामध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध व्हावा याकरिता जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण रुग्णालय राधानगरी व ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट प्रस्तावित केला असून शासनामार्फत अधिक प्रमाणात निधी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आमदार फंडातून सदर प्रकल्पांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी विनंती केली होती. त्या अनुषंगाने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या फंडातून राधानगरी ग्रामीण रुग्णालयासाठी २५ लाख व गारगोटी ग्रामीण रुग्णालयासाठी २५ लाख असा ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून प्रति दिवस शंभर जम्बो ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती केली जाणार आहे.