corona virus : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:19 PM2020-08-25T16:19:39+5:302020-08-25T16:22:47+5:30
गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० सिलिंडर क्षमतेचा ऑक्सिजन जनरेटर आणि इचलकरंजी येथील आयजीएममध्ये सहा केएलचा लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्यता दिली.
कोल्हापूर : गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० सिलिंडर क्षमतेचा ऑक्सिजन जनरेटर आणि इचलकरंजी येथील आयजीएममध्ये सहा केएलचा लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्यता दिली. या सुविधा तत्काळ कार्यान्वित करावी, असे निर्देश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांना दिले.
कोव्हिड-१९ रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध असणारा औषध आणि ऑक्सिजन साठा, संभाव्य मागणी, रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट किट, पीपीई किट, ग्लोव्हज, साधनसामग्री आणि मनुष्यबळाचा आढावा जिल्हाधिकारी देसाई यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली.
रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट किट, पीपीई किट याबाबत मागणी करून साठा करून ठेवावा. आवश्यक असणारी औषधे, रेमिडसिव्हीर इंजेक्शन्स, झिंक, व्हिटॅमिन सी याचादेखील साठा करून ठेवा. आजरा, चंदगड येथील कोविड काळजी केंद्रांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑक्सिजन लाईनचे काम पूर्ण करावे.
सीपीआरमधील दूधगंगा इमारतीमध्ये २०० आणि आयजीएममध्येही १०० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याबाबत आवश्यक मनुष्यबळ आणि साधन सामग्रीबाबत प्रस्ताव द्या. वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी स्थानिक स्तरावर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबरोबर करार करून कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. बी. शेळके, डॉ. अनिता सैबन्नावर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होते.
उद्योगांना १५ टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्यास मुभा
जिल्ह्यातील सर्वच ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पुढील पाच दिवस (दि. २९ ऑगस्टपर्यंत) १५ टक्के ऑक्सिजन उद्योगांना, तर ८५ टक्के वैद्यकीय कारणांसाठी पुरवठा करण्यास मुभा द्यावी. त्यानंतर (दि. ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत) एकूण उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनपैकी २० टक्के ऑक्सिजन हा औद्योगिक वापरासाठी देण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता भासणार नाही, याप्रकारे पुरवठा नियंत्रित करण्याचे निर्देश त्यांी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे यांना दिले.