ऑक्सिजनची कोल्हापूर जिल्ह्याची स्थिती चांगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:23+5:302021-04-22T04:25:23+5:30
कोल्हापूर : पुणे विभागामध्ये ऑक्सिजनच्याबाबतीत कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती चांगली असल्याचे प्रशंसाेद्गार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी ...
कोल्हापूर : पुणे विभागामध्ये ऑक्सिजनच्याबाबतीत कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती चांगली असल्याचे प्रशंसाेद्गार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी काढले. त्यांनी संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे पाच जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व आरोग्याधिकाऱ्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ऑक्सिजनची वाढीव मागणी होत असताना एकमेव कोल्हापूर जिल्हा असा आहे की जेथून मागणी होत नाही. उलट इतर जिल्ह्यांना आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. याच पध्दतीने जिल्ह्याचे कामकाज सुरू ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मात्र आता कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. त्यामुळे या पुढच्या काळात इतर जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करताना मर्यादा येणार असल्याचेही स्पष्ट केले.
यावेळी महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.