दहा दिवसांत ऑक्सिजन प्लांट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:17 AM2021-07-01T04:17:58+5:302021-07-01T04:17:58+5:30
कोल्हापूर : नेहरूनगरातील आयसोलेशन रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार महानगरपालिका प्रशासनाने ...
कोल्हापूर : नेहरूनगरातील आयसोलेशन रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. सुमारे ७९ लाख रुपयांच्या या प्रकल्पाचे काम कोल्हापुरातीलच एका ठेकेदाराने घेतले आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयातून ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. ऑक्सिजन मिळविण्यासाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनास बरेच झगडावे लागत होते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना सांगून जिल्हा नियोजन मंडळातून ८० लाखांचा निधी देण्याची विनंती केली होती.
पालकमंत्री पाटील यांनी ही विनंती मान्य करून तत्काळ प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आणि प्रस्ताव सादर होताच तो मंजूरही करण्यात आला. त्यानुसार आयसोलेशन रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारही निश्चित केला. कोल्हापुरातील एका ठेकेदाराने हे काम ७९ लाखाला घेतले आहे.
ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी करावे लागणारे सर्व प्रकारचे सिव्हील वर्क पूर्ण झाले आहे. प्लांटची टाकी तसेच अन्य सर्व साहित्य अहमदाबादहून आणण्यात येणार आहे. आज, गुरुवारी अहमदाबादहून टाकी व साहित्य पाठविले जाण्याची शक्यता आहे. सर्व साहित्य कोल्हापुरात आल्यापासून पुढील दहा दिवसांत प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोरोना महामारीमुळे महानगरपालिकेची रुग्णालये अधिक सक्षम होत असून तेथील सुविधांच्या सुधारणांवर भर दिला जात आहे. स्वत:चा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना त्याला लाभ होणार आहे.
- १९ लाखांची झाली बचत -
गडहिंग्लजमधील एका ठेकेदाराने ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ९८ लाखांची निविदा भरली होती. ही निविदा मंजूर करून ठेकेदारास काम द्यावे, असा आग्रह काही जणांकडून झाला. परंतु प्रशासनाने ७९ लाखांची निविदा मंजूर करून १९ लाख रुपयांची बचत केली.