पोर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ६० लाखांचा ऑक्सिजन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:34+5:302021-09-02T04:49:34+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील पोर्ले प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन प्लांट ...
कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील पोर्ले प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. यासाठी अमेरिकेअर इंडिया फाउंडेशनने ६० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याहीपुढे जाऊन आणखी ८० लाख रुपये खर्चून फाउंडेशन चार ठिकाणची प्रसूतिगृहेही अद्ययावत करून देणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन बेडची जिल्ह्यात मोठी टंचाई भासली. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या लाटेवेळीच सीपीआर, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, आयजीएम इचलकरंजी येथेही ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणेरी मठावरील रुग्णालयातही असा प्लांट उभारण्यात आला आहे.
तरीही यापुढच्या काळात ऑक्सिजनची वाढती गरज ओळखून कोल्हापूर जिल्ह्याला अमेरिकेअर इंडिया फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे. त्यानुसार सध्या पोर्ले तर्फ ठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात प्रतिमिनिट १५० लिटर ऑक्सिजननिर्मिती करणारा प्लांट उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी फाउंडेशन टाकण्याचे काम संपले असून आता लवकरच या ठिकाणी मशिनरी बसवण्यात येणार आहे.
त्याच पद्धतीने शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे, भेडसगाव आणि हातकणंगले तालुक्यातील हुपरी आणि हेर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतिगृहे अद्ययावत करण्याचे कामही या फाउंडेशनकडून करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी आरोग्य केंद्रासाठी २० लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. स्वच्छता रंगकाम, योगाखोलीची सुसज्जता, गरम पाण्याची सोय अशा कामांसाठी ही निधी खर्च करण्यात येणार आहे.
चौकट
३० रुग्णांची होणार सोय
पोर्ले येथील या आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांट झाल्यानंतर या ठिकाणी ३० रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. त्यासाठीचे ऑक्सिजन पाईप लाईनचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंतिम टप्प्यात आहे. यामुळे या परिसरातील गंभीर रुग्णांची सोय होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.
कोट
गेली १५ वर्षे अमेरिकेअर इंडिया फाउंडेशन आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. वैद्यकीय शिबिरांपासून ते ऑक्सिजन प्लांट निर्मितीपर्यंत विविध मूलभूत आरोग्य सुविधा उभारण्यासाठीे फाउंडेशन कार्यरत आहे. ग्रामीण जनतेच्या आरोग्य सुविधांसाठीे याहीपुढे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कोरोना आणि महापूर काळात फाउंडेशनने कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले आहेत.
श्रीपाद देसाई, कार्यकारी संचालक, अमेरिकेअर इंडिया फाउंडेशन, मुंबई
०१्०९२०२१ कोल पोर्ले ऑक्सिजन प्लांट