ऑक्सिजन निर्मिती, साठवणूक क्षमता वाढवा :जिल्हाधिकारी रेखावार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 07:08 PM2021-07-19T19:08:58+5:302021-07-19T19:11:37+5:30
CoronaVirus In Kolhapur : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवा, रिफिलिंगची ठिकाणे वाढवा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची कामे तत्काळ पूर्ण करा. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या बेडची संख्या वाढवा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिल्या.
कोल्हापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवा, रिफिलिंगची ठिकाणे वाढवा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची कामे तत्काळ पूर्ण करा. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या बेडची संख्या वाढवा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषा कुंभार तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, शहर व ग्रामीण भागांतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विद्युत पुरवठा व विद्युत मशिनरी सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पूर्ण क्षमतेचे जनरेटर बसवावेत. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करा.
येथील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी तेथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढवा, स्राव तपासणीचे अहवाल वेळेत मिळण्यासाठी शासकीय प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होणे गरजेचे आहे, यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता तत्काळ घेऊन कामे गतीने मार्गी लावावीत.
सद्य:स्थितीत असणारे आयसीयू बेड, उपलब्ध व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लॅन्ट, जनरेटर सुविधा, ऑनलाईन माहिती भरण्याची वेळेत कार्यवाही करणे, स्राव तपासणी क्षमता, बिलांचे ऑडिट, मृत्यू ऑडिटवर अधिक लक्ष देणे, रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी उपाययोजना, रुग्णवाहिका, लसीकरण आदी विषयांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांशी संबंधित कामाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.
जादा बिल आकारल्यास रुग्णालयांवर कारवाई
रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांचे ऑडिट करणाऱ्या पथकांनी बिलांची काटेकोर तपासणी करून रोजच्या रोज अहवाल सादर करावा. जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. बिलांचे ऑडिट आणि डेथ ऑडिटवर अधिक लक्ष देण्यात येणार असून रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.