ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट जुलैमध्ये सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:39+5:302021-06-02T04:18:39+5:30
कोल्हापूर : ऑक्सिजन निर्मितीत जिल्हा स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने उभारण्यात येणारे १४ ऑक्सिजन प्लॅन्ट जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता ...
कोल्हापूर : ऑक्सिजन निर्मितीत जिल्हा स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने उभारण्यात येणारे १४ ऑक्सिजन प्लॅन्ट जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंपनीला ५० दिवसांचा कालावधी दिला असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोरोना विषाणूचा रुग्णाच्या फुफ्फुसांवर परिणाम होत असल्याने ऑक्सिजनची पातळी खालावते. परिणामी रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. सध्या जिल्ह्याला कोल्हापूर ऑक्सिजनसह पुणे व रायगडमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि भविष्यात वाढणारी रुग्णसंख्या व ऑक्सिजनची मागणी याचा विचार करून जिल्ह्यात १४ प्लॅन्ट उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हैदराबादमधील लॅन्डस्काय कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली.
प्लॅन्ट उभारणीसाठी फौंडेशन व वीजपुरवठा या दोनच गोष्टी स्थानिक पातळीवर केल्या जातात. कंपनीकडून ऑक्सिजन प्लॅन्ट तयार करूनच आणला जातो. तो रुग्णालयांच्या ठिकाणी आणून बसवणे व कार्यान्वित करणे या बाबी कराव्या लागतात. सध्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ऑक्सिजन प्लॅन्ट बसवले जात असल्याने काम पूर्ण करण्यासाठी कंपन्यांनी ६० दिवसांचा कालावधी मागितला आहे; पण प्रशासनाने त्यांना ५० दिवसांची मुदत दिली आहे. १५ एप्रिलच्यादरम्यान निविदा मंजूर करण्यात आली. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्लॅन्ट कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
--
उभारण्यात येणारे ऑक्सिजन प्लॅन्ट
रुग्णालये : सिलिंडरची संख्या
सीपीआर : २०० सिलिंडरचे प्रत्येकी दोन प्लॅन्ट
आयजीएम, इचलकरंजी : २०० सिलिंडरचे प्रत्येकी दोन प्लॅन्ट
गडहिंग्लज : २००
कोडोली : १००
मुरगूड : १००
राधानगरी : १००
मलकापूर : १००
चंदगड : १००
खुपिरे : १००
गारगोटी : १००
--
रिफिलिंगची सुविधा
वरील ऑक्सिजन प्लॅन्टपैकी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, आयजीएम, चंदगड, खुपिरे व गारगोटी येथे ऑक्सिजन रिफिलिंगचीदेखील सोय कऱण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली होती; मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली. रिफिलिंगसाठी कॉम्प्रेसरची गरज असते. त्याचा तुटवडा असल्याने कंपन्या रिफिलिंगऐवजी ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यालाच प्राधान्य देतात.
--