Oxygen Shortage: “आम्ही ऑक्सिजनचा साठा वेळीच पुरवला होता, मग...”; कोल्हापूर महापालिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:50 PM2021-05-01T17:50:26+5:302021-05-01T18:15:11+5:30
ऑक्सिजन नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समजताच मी स्वतः याठिकाणी येऊन तपासणी केली. शुक्रवार ३० एप्रिलपर्यंत प्रशासनाकडून हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा झाला होता
कोल्हापूर – राज्यात एकीकडे ऑक्सिजन तुटवडा होत असताना दुसरीकडे कोल्हापूरातऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजन अभावी हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत असला तरी आम्ही ऑक्सिजनचा साठा पुरवला होता. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणा यातून दिसत आहे. तरीही प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी दिले आहे.
या प्रकरणावर निखील मोरे म्हणाले की, ऑक्सिजन नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समजताच मी स्वतः याठिकाणी येऊन तपासणी केली. शुक्रवार ३० एप्रिलपर्यंत प्रशासनाकडून हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा झाला होता. तसेच आणखी एका एजन्सीकडून आज १२ पर्यंत ऑक्सिजन पुरवठा होणार होता. हॉस्पिटलकडे ऑक्सिजनचा साठा होता. पण रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला त्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. नेमका याबाबत आमचे डॉक्टरही तपास करतील. पण सध्या प्रथमदर्शनी ऑक्सिजनचा साठा पुरेसा असतानाही रुग्णाचा मृत्यू झाल्याचं दिसून येते. याबद्दल पुढची कारवाई चालू आहे. डिटेल पंचनामा करण्यात येईल. नातेवाईकांनी जो आरोप लावलाय त्याबाबत पोलीसही माहिती घेत आहेत. जी काही माहिती समोर येईल त्यानंतर या संदर्भात पुढील कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले.
कोल्हापूरात ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर वेळीच ऑक्सिजन पुरवठा केल्याचा महापालिकेचा दावा #OxygenCylinders#kolhapur@satejppic.twitter.com/kALpQs0ueh
— Lokmat (@MiLOKMAT) May 1, 2021
काय आहे प्रकरण?
कोल्हापूरमध्ये एका रुग्णानं ऑक्सिजनअभावी प्राण सोडल्याची घटना घडली. एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त करताना दुसरीकडे ऑक्सिजनअभावी रुग्णाची प्राणज्योत मालवली. माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं वय ७५ वर्षे होतं. रंकाळा टॉवर परिसरातील स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या महालक्ष्मी रुग्णालयात सर्जेराव यांच्यावर उपचार सुरू होते. २६ एप्रिलला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
राज्यातील ऑक्सिजनची स्थिती
राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या आहेत. तसेच इतर छोटे उत्पादक मिळून राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२७० टन इतकी आहे जेएसडब्ल्यू स्टील यांनी अतिरिक्त ८० मे. टन उत्पादन वाढवले आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेला कोटा १७८४ टन इतका आहे.त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे. राज्यात सध्या १६५० मेट्रीक टन ऑक्सिजन आवश्यकता आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १८१४ मे.टन ऑक्सिजनचा कोटा निश्चित केलेला असला तरी प्रत्यक्षात कसा बसा १६५० मे.टन पर्यंत ऑक्सिजन राज्यास उपलब्ध होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे व्दारा १०० टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला अशी माहिती मुख्यंत्र्यांनी दिली होती.