ऑक्सिजन टँकरला आता रुग्णवाहिकेचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:07+5:302021-04-20T04:24:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मेडिकल ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या क्रायोजनिक टँकरना विनाअडथळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मेडिकल ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या क्रायोजनिक टँकरना विनाअडथळा लवकरात लवकर रुग्णांपर्यंत, हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेचा दर्जा बहाल केला आहे. त्यानुसार कोल्हापुरातील एका ऑक्सिजन टँकरला हा विशेष दर्जा दिल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी सोमवारी दिली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी तातडीने एका क्रायोजनिक ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा दिला. तत्पूर्वी या टँकरला फ्लॅश लाइट, सायरन व ॲम्ब्युलन्स लिहिलेली पाटी अशा दुरुस्त्या करण्याची सूचना दिली होती, त्यानुसार टँकर मालकाने ही दुरुस्ती केली. रुग्णवाहिकेचा दर्जा दिलेल्या टँकरला स्पीड गव्हर्नरचे बंधन असणार नाही. टोल नाक्यावर सुद्धा त्यांना न थांबवता जागा करून दिली जाईल. कोणी अधिकारीसुद्धा तपासणी करण्यासाठी अशा वाहनांना अडवणार नाही व टँकर विनाअडथळा ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचतील. अशाप्रकारचे सहा टँकर्स कोल्हापूर ऑक्सिजन या कंपनीचे आहेत, त्यापैकी एका टँकरला परवानगी देण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूरचे सर्व अधिकारी ऑक्सिजन टँकर्स वाहतुकीचे नियोजन करत असून, विनाअडथळा असे टँकर्स गरज असणाऱ्या कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्नशील आहेत.
यावेळी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे व रोहित काटकर, मोटर वाहन निरीक्षक नीलेश ठोंबरे, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव, वाहन चालक बाळासाहेब कुंभार व राजाराम पारधी आदी कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : १९०४२०२१- कोल -आरटीओ
कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारी क्रायोजनिक ऑक्सिजन टँकरला विशेष रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.