विशाखापट्टणमहून आलेला ऑक्सिजन शहरात वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:06+5:302021-04-25T04:25:06+5:30
कोल्हापूर : विशाखापट्टणम येथून आलेला ऑक्सिजन शहरामध्ये शनिवारी पहाटे वितरित करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता रेल्वेद्वारे आलेला ...
कोल्हापूर : विशाखापट्टणम येथून आलेला ऑक्सिजन शहरामध्ये शनिवारी पहाटे वितरित करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता रेल्वेद्वारे आलेला टॅंकर कोल्हापुरात उतरून घेण्यात आला.
सुरुवातीला सीपीआरला प्राधान्य देत त्या ठिकाणी रात्रीच ऑक्सिजनचे वितरण करण्यात आले. यानंतर महामार्गालगतच्या खासगी रुग्णालयाला ७ टन ऑक्सिजन वितरित करण्यात आला. एकदम १५ टन ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने शहरातील रुग्णालयांना दिलासा मिळाला आहे.
सध्या जरी कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत असला, तरी दोन, तीन दिवसांत खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनची टंचाई भासते. यावर उपाय म्हणून बेल्लारी येथील एक ऑक्सिजनचा टॅंकर मागविण्याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संपर्क साधला आहे. अजूनही काही प्रकल्पांच्या माध्यमातून औद्याेगिक कारणांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरू असल्याची माहिती असून, याबाबत दिलेल्या सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.